अभिजात दर्जासाठी हवेत सर्वसमावेशक प्रयत्न – बाविस्कर

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले असतांनाही गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वसामान्य मराठी जनतेने सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन के.नारखेडेतील उपशिक्षिका नलिनी बाविस्कर-वानखेडे यांनी येथे केले.

भुसावळ येथील बस आगारात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आगारप्रमुख संदीप पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय यंत्र अभियंता पी.एस. वासकर, विभागीय भंडार अधिकारी रोहन पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राकेश शिवदे, लेखा परिक्षक ए.एम. सोनवणे, एस.एस. सहारे, प्रविण टोके, शेखर धांडे, जी.एस. ठाकरे उपस्थित होते.

प्रास्ताविक आगारप्रमुख संदीप पाटील यांनी मराठी भाषेचा दैनंदिन वापरात उपयोग करण्याचे सांगितले. के.नारखेडे विद्यालयाच्या उपशिक्षिका नलिनी बाविस्कर-वानखेडे यांनी भाषा संवर्धन व विकास या विषयावर बोलतांना सांगितले की, युनुस्कोच्या सर्वेनुसार साडेसहा हजार भाषा व बोलीभाषा आहेत. यात मराठीचा तेरावा क्रमांक आहे.

तसेच अडीच हजार वर्ष प्राचीन भाषेची परंपरा मराठीला आहे. मात्र तरीही केंद्रपातळीवर तिला सन्मानाचे स्थान मिळू शकलेले नाही. याला आपण मराठी माणूस म्हणून जबाबदार आहोत. दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. यामुळे इतर भाषिकांना मराठी भाषा शिकण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे.

वाचनामुळे शब्दसंपत्तीत वाढ होते. तसेच प्राथमिक शिक्षक मातृभाषेतून झाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील उपशिक्षक सुनिल वानखेडे यांनी मराठी भाषेत इतर भाषेपेक्षा जास्त शब्दसंपत्ती असल्याने ती आधीच समृद्ध आहे.

परंतु आपण तिचा सातत्याने वापर करत नसल्याने शब्दसंपत्तीचा विसर पडून त्याजागी पर्याय म्हणून इतर भाषेतील शब्द आपण वापरत आहोत, ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रवाशांना मराठी पुस्तकांचे वाटप

दरम्यान, सकाळच्या सत्रात बसस्थानकावर रांगोळी व ङ्गुलहारांनी स्थानक सजविण्यात आले होते. पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांच्या हस्ते विद्यार्थी प्रवाशांना मराठी भाषेची पुस्तके वाटप करण्यात आली.

LEAVE A REPLY

*