… अन्यथा सेतू केंद्रच रद्द करू

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी
शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी नागरिक महा- इ-सेवा केंद्रात जातात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी विविध दाखले वा प्रमाणपत्र यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने महा-इ-सेवा केंद्रचालकांना दिले आहेत.

तपासणीत दरपत्रक लावले नसल्याचे आढळून आल्यास संबंधित केंद्र रद्द केले जाईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिला आहे.

एप्रिल ते जून या काळात शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशाची गर्दी पाहावयास मिळते. याचवेळी सेतू कार्यालयांमध्येही दाखल्यांसाठी लांबच लांब रांगा लागतात.

शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा, जातीचा, तात्पुरता रहिवास, अल्पभूधारक आदी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने महा-इ-सेवा केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात 377 महा-इ-सेवा केंद्रे सुरू आहेत.

दाखल्यांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी असलेले कार्यालय गाठावे लागते. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असे.

याकरिता सरकारने महा-इ-सेवा केंद्राच्या माध्यमातूनच विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महा-इ-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जातात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयापेक्षा महा-इ-सेतू कार्यालयातून जलद गतीने दाखले मिळत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात फेर्‍याही माराव्या लागत नाहीत.

ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते. परंतु महा-इ-सेतू केंद्राद्वारे दाखले देण्यासाठी काही ठिकाणी अवाजवी शुल्क आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. कोणत्या दाखल्यासाठी किती शासकीय दर आकारण्यात येतात याबाबत विद्यार्थी वा पालकांना माहिती नसते.

याच अज्ञानाचा फायदा घेऊन केंद्रचालकांकडून शासकीय दराच्या पाचपट शुल्क आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय दरानुसार कमीत कमी 33 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये शुल्क आकारणी केली जाते.

मात्र काही ठिकाणी अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्याची दखल घेत आता महा-इ-सेतू केंद्रचालकांनी विविध दाखल्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*