अधिकार्‍यांनी काय साधले?

0
भेदाभेदांना तिलांजली देत सर्वांना सामावून घेण्याचे काम भारतीय संस्कृती करत आली आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी अवघ्या विश्‍वासाठी पसायदान मागितले. कवी यशेंद्र म्हणतात,

हे विश्‍वचि माझे घर, ज्ञानदेव सांगून गेले
संकुचित हे जगणे, तयांनी विश्‍वरूप केले
पण वडील परप्रांतीय असल्याने व सरकारी सेवकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ सिन्नरमधील काही मुलींवर आली आहे. उत्तर प्रदेशातील कुशवाह कुटुंब नांदूरशिंगोटे येथे उदरनिर्वाहासाठी तेहतीस वर्षांपूर्वी स्थायिक झाले. त्यांचे कुटुंब उच्चउन्नत गटात मोडत नसल्याचा दाखला (नॉनक्रिमिलियर) देण्यास प्रांताधिकार्‍यांनी नकार दिल्याने चार मुलींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ ओढवली आहे.

कुटुंबाचा राज्यात किमान साठ वर्षांचा रहिवास नाही. ते कुटुंब काछी जातीचे असून त्या जातीचा समावेश महाराष्ट्राच्या ओबीसी जातींच्या यादीत नाही, अशी कारणे संबंधित अधिकार्‍यांनी नमूद केली आहेत. सरकारी अधिकारी व सेवकांना कायद्याच्या अधीन राहून कामे करावी लागतात. कायद्यानुसार कामाची चौकट सोयीनुसार बदलण्यात सरकारी सेवकांची कुशलता कोण नाकारणार?

अनेक अधिकारी चौकटीबाहेरचा दृष्टिकोन स्वीकारत काम करत आहेत. अधिकार्‍यांनी फक्त नियमावर बोट ठेवावे व चौकटीबाहेरचा दृष्टिकोन स्वीकारू नये, असा सरकारी नियम आहे का? पण संकुचित दृष्टिकोन स्वीकारण्यात धन्यता मानण्याची चाकोरीबाह्य पद्धत वरकमाईसाठी सोयीची ठरते. रामावतार अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचे वर्तन एकवेळ समजण्यासारखे आहे. सरकारी अधिकारी तर शिक्षित आहेत.

त्यांच्याकडून तर्कसुसंगत वर्तनाची जनतेची अपेक्षा चूक ठरावी का? राज्यात सलग पंधरा वर्षे रहिवासाचा ग्रामसेवक वा तलाठी यांचा दाखला त्या व्यक्तीला अधिवास प्रमाणपत्रासाठी पुरेसा ठरतो. मग कुशवाह यांच्या कुटुंबाला राज्यात साठ वर्षांचा अधिवास नाही असे का सांगितले गेले? झोपडपट्टीत किती काळ राहिला याचा विचार न करता मतदार यादीत समावेश होऊ शकतो. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अनेक नियमबाह्य कामे नियमात बसवली जातात; पण खर्चाची कुवत नसलेल्याची मात्र अडवणूक होते.

राज्याने शिक्षण हक्क कायदा केला आहे. त्या कायद्याला हरताळ फासणारे वर्तन सरकारी सेवक कसे करू शकतात? असा आडमुठेपणा करून सरकारी सेवकांनी काय मिळवले? की गरिबाकडून काही मिळण्याची शक्यता नाही म्हणून असे होते? सरकारी सेवकांत माणुसकी शिल्लक आहे याची प्रचिती जनतेला आणून देण्याची संधी संबंधित अधिकार्‍यांनी दवडण्यामागची कारणे स्पष्ट होतील का?

LEAVE A REPLY

*