अत्याचाराविरोधात महिलांसाठी ‘आयोग आपल्या दारी’ उपक्रम

0

जळगाव | प्रतिनिधी :  पिडीतांना न्याय मिळावा यात वेळ व पैसा वाया जाऊ नये म्हणून राज्य महिला आयोगाने ‘आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोगामार्फत होत असल्यची माहिती महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी येथे कार्यशाळेत दिली.

राज्य महिला आयोग आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ विषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे होते.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. आर.एम. मिश्रा, विजेता सिंग, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलतांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत गप्प न राहता धाडसाने समोर यावे. बर्‍याचदा कायदेशीर प्रक्रियेत वेळ जातो म्हणूनही लोक गप्प बसतात.

मात्र पिडीतांना न्याय मिळावा यात वेळ व पैसा वाया जाऊ नये म्हणून राज्य महिला आयोगाने ‘आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोगामार्फत होत आहे. त्याअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अत्याचाराच्या प्रकरणात समाजानेही जागरुक राहणे गरजेचे असून त्याद्वारेही अनेक महिला अत्याचाराची प्रकरणे मार्गी लावता येऊन तुटणारे संसार पुन्हा सुरळीत होतात, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, कायद्याविषयीची जनजागृती ही आवश्यक असून त्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्गाने प्रयत्न करावा. महिलांवरील अत्याचारासंदर्भात समाजानेही जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले. तर न्या. मिश्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती कारणे व उपाय या संदर्भात विजेता सिंह, संरक्षण अधिकारी यांची भूमिका व न्यायालयीक प्रक्रिया याविषयी ऍड. केतन सोनार, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमअंतर्गत पोलिसांची भूमिका, कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर पोलीस उपनिरीक्षक नीता मांडवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन केतन सोनार यांनी तर आभारप्रदर्शन संरक्षण अधिकारी आरती साळुंखे यांनी केले.

LEAVE A REPLY

*