Type to search

धुळे

अतिवृष्टीचा 2 लाख 60 हजार शेतकर्‍यांना फटका

Share

धुळे । अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख 60 हजार 440 शेतकर्‍यांना फटका बसला असून एकूण  तीन लाख 61 हजार 849.23 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही माहिती समोर आली आहे. दि.8 नोव्हेंबर रोजी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला.

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका, बाजरी, ज्वारी, कापूस आदी पिकांना फटका बसला आहे. त्यात मका, बाजरीची कणसे कापणीला आलेले होते. परंतु, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला. शेतात पाणी साचल्याने पिकांची नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे केले जात होते. पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्यात आले.

पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण 2 लाख 60 हजार 440 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांचे एकूण 3 लाख 61 हजार 849.23 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकर्‍यांना भरपाई देण्याबाबतचा निर्णय शासनाकडून होणार आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता भरपाई मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामात 76 हजार 802 शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे. त्यांच्याही पिकांचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांच्या मालाचे काढणीनंतर नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने सदर अहवाल शासनाकडे सादर केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!