अतिक्रमण पथकासमोरच पेटवून घेतले

0

कुलकर्णींची मृत्यूशी झुंज, श्रीरामपुरातील गळनिंबची घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे अनेक दिवसांपासून अतिक्रमण काढण्याबाबत वाद सुरु होता. काही अतिक्रमणधारक या ठिकाणाहून हलण्यास तयार नव्हते, परंतु हनुमान मंदिराजवळील पत्र्याच्या खोल्याचे ग्रामपंचायतच्या सार्वजनिक जागेतील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात काल सुरू असताना एका अतिक्रमणधारकाने घरात जात प्लायवूडचा दरवाजा बंद करुन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

त्याच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल टस्ट या रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात आत्महत्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला मोहिम थांबवावी लागली. आता हे अतिक्रमण कधी निघणार? अशी चर्चा गावात सुरु होती.
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील हनुमान मंदिरासमोर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायती अनेकवेळा लेखी, तोंडी सूचना दिल्या होत्या, तसेच ग्रामसभेतही याविषयी ठराव करण्यात आले होते. त्यानुसार काल प्रशासकीय अतिक्रमण पथकाने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या.

त्यातच गळनिंब येथील अतिक्रमणधारक अनिल अंबादास कुलकर्णी (वय-61) यांना अतिक्रमण पथक व पोलीस उपनिरिक्षक भालचंद्र शिंदे हे चर्चा करण्यासाठी घराच्या बाहेर बोलावत होते. याबाबत कुलकर्णी यांच्या पत्नी व मुलांनीही या जागेच्या वादात पडू नका, जागा सोडून द्या असे सांगत होते. पण कुलकर्णी यांनी ऐकले नाही. त्याचवेळी कुलकर्णी यांनी घराची कडी आतून लावून घेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

त्यावेळी आतमध्ये कुलकर्णी यांची पत्नी होती. त्यावेळी त्यांनी हा सर्व प्रकार उभ्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याही केवळ वाचवा वाचवा असेच ओरडत होत्या. कुलकर्णी यांनी पेटवून घेतले असल्याचे बाहेर असलेल्या पोलिसांना व अतिक्रमण पथकास कळाले. त्यांनी तातडीने दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अतिक्रमण पथकाच्या जेसीबी मशिनने घराचा दरवाजा तोडण्यात येऊन त्यांना बाहेर काढण्यात आले.

त्यांना बाहेर काढले त्यावेळी 90 टक्के भाजलेले होते. त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असून याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना घडल्यानंतर डी.वाय.एस.पी. सागर पाटील, रोहीदास पवार, तहसिलदार सुभाष दळवी, गटविकास अधिकारी जाधव, सभापती दीपक पटारे आदींनी घटनास्थळी भेट दिली. अखेर काल अतिक्रमण काढण्याचे आदेश असल्याने लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे यांनी सात पोलीस कर्मचारी तसेच श्रीरामपूर तहसील कार्यालयाचे सर्कल मंडलिक व गामसेवक अमोल साळवे, शिरसगावचे तलाठी साळवे, बेलापूर आरोग्य केंदाचे चोखर, पंचायत समितीची विस्तार अधिकारी अभंग, महसूल कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात कुलकर्णी यांचे अतिक्रमण काढणार होते.

त्याची प्रक्रिया सुरू असतानाच कुलकर्णी यांनी रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. त्यांना विझविण्यासाठी  पोलीस पथकासह काही नागरिकांनी मदत केली. याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. पोलीस कॉन्स्टेबल उजागरे व नेहे यांनी कुलकर्णी यांना पकडून त्यांना विझविण्याचा प्रयत्न केला. हा सर्वहा सर्व घटनाक्रम चालू असताना ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती तर गावाला पोलिसांच्या छावणीचे रुप आले होते. सर्व शासकीय व सरकारी अधिकारी गावात काल संध्याकाळपर्यंत गावात ठाण मांडून होते. काही प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात चकरा मारत होते व सगळेच कुलकर्णींच्या तब्बेतीबाबत चौकशी करत होते.

दोषी कोण?, शहनिशा करु
पोलीस बंदोबस्त अतिक्रमण काढण्यासाठी देण्यात आला होता. पेटवून घेतलेले कुलकर्णी यांच्यावर प्रवरा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दोषी कोण आहे याची शहनिशा करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करणार आहेत.
– रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, लोणी

न ऐकल्याने दुर्घटना
हनुमान मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी श्री. कुलकर्णी यांना वेळोवेळी सुचना देवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमण काढण्याच्या सूचना त्यांनी एकेली असती तर ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे असे कृत्य कोणीही करून नये.
-सुभाष दळवी, तहसिलदार, श्रीरामपूर

सामंजस्याची भूमिका हवी होती
गावातील हनुमान मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्याबाबचा विषय हा जुना असला तरी या ठिकाणचे अतिक्रमण काढणे गरजेचे होते. आणि त्याबाबत प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती. परंतु कुलकर्णी यांनी सामस्याची भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती.
– रोहिणी संदीप जाटे, सरपंच, गळनिंब

 

LEAVE A REPLY

*