अण्णांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

0

शेतकरी-सरकार मध्यस्थीची तयारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या वेदनांची जाणीव आहे. शेतकरी संपाशी सहमती दर्शवित ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्रीशी हजारे यांची चर्चा झाली असून ते चर्चेस तयार आहेत. शेतमालास खर्चावर आधारीत हमीभाव मिळाला पाहिजे असे स्पष्ट करत शेतकरी संपाचे आंदोलन हे राजकारणविरहित असावे असे मत हजारे यांनी व्यक्त केले आहे. आंदोलनकर्त्यांनी संयम ठेऊन शांततेने आंदोलन करणे आवश्यक असल्याचे सांगत शासनाने वेळीच शेतकर्‍यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

शेतकरी संपाबाबत हजारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे. अनेक वर्षे सातत्याने हे सुरू आहे.

जेव्हा सरकार शेतकर्‍यांच्या सहनशिलतेला दाद देत नसेल तेव्हा त्याला नाइलाजाने कायदा हातात घेण्याची वेळ येते. असे घडणे हे समाज, राज्य व राष्ट्र हिताचे नसते. त्यातून कधी कधी आपणच आपल्या हाताने आपलेच नुकसान करुन घेत असतो.कारण राष्ट्रीय संपत्ती ही आपलीच संपत्ती आहे. म्हणून अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आंदोलनकर्त्यांनी संयम ठेऊन शांततेने आंदोलन करणे आवश्यक आहे. तसेच शासनाने वेळीच विचार करून शेतकर्‍यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी.
जे शेतकरी आंदोलनामध्ये उतरले आहेत त्यांना होणार्‍या वेदनांची मला जाणीव आहे. म्हणूनच मी शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या भूमि अधिग्रहण बिलाच्या विरोधात दिल्लीत आंदोलने केली व सरकारला ते बील मागे घ्यावे लागले. आंदोलन करताना कुठेही हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलन व्हावे असे वाटते. मी गेली पस्तीस वर्षे समाजहितासाठी वेगवेगळी शांततापूर्ण व अहिंसक आंदोलने करीत आलो आहे. म्हणून सरकारला ती आंदोलने मोडून काढता आली नाहीत. याउलट आंदोलनामुळे त्यांना समाजहिताचे निर्णय घ्यावे लागले आहेत.
या आंदोलना संबंधाने काही कार्यकर्ते दोन वेळा माझ्याकडे आले होते. या कार्यकर्त्यांसोबत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा झालेल्या आहेत. अहिंसेच्या मार्गाने घटना, कायदे, नियम या सर्व गोष्टींचा विचार करुन आंदोलनाची प्रदीर्घ कालावधीसाठी दिशा ठरवून आंदोलन होणे आवश्यक वाटते. मी या आंदोलनाशी सहमत आहे. कारण अशी आंदोलने करणे घटनेने जनतेला दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझी दोन वेळा यासंबंधी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनी आश्वासन दिले असून ते चर्चेला तयार आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा करता येऊ शकेल. शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सदर बैठकीसाठी उपस्थित राहू शकेल. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर व शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी पुढील काळात राजकारण विरहित प्रदीर्घ आंदोलनाची दिशा ठरवीणे आवश्यक असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

अण्णांच्या संस्थेलाही घाटा
अण्णांच्या संस्थेतर्फे नुकतेच गेल्या दहा महिन्यात मिरची, शेवगा, काकडी यासारखी पिके घेण्यात आली. सुधारीत पद्धतीने सेंद्रीय शेती केली. पण शेतीमालाला भाव नसल्याने दीड लाख रुपये खर्च करुन प्रत्यक्षात पंचवीस हजार रुपये सुद्धा उत्पन्न मिळाले नाही. संस्था म्हणून आम्ही सहन केले. मात्र ज्या शेतकर्‍याने बँकेचे कर्ज किंवा इतर लोकांचे कर्ज घेऊन शेती उत्पन्नासाठी खर्च केला आणि उत्पन्न मिळाले नाही किंवा मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही तर अशा परिस्थितीत नैराश्यापोटी आत्महत्या करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहत नसल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*