Type to search

आरोग्यदूत

अचानक येणारे चक्कर

Share

कानाच्या आतील बाजूस अंतर्कर्णामध्ये शरीराचा तोल सांभाळणारे, लॅबरिंथ नावाचे नाजूक यंत्र असते. बसताना, झोपताना, उभे असताना, चालताना प्रत्येक स्थितीबद्दलचे ज्ञान ते यंत्र मेंदूकडे पाठवत असते. अंतर्कर्णामध्ये काही दोष, दृष्टीदोष, मेंदूकडे जाणार्‍या संदेश वहनातील दोष यामुळे चक्कर येते. जायंट व्हिल वा रहाट गाडग्यात सातत्याने बदलणार्‍या स्थितीबरोबर, अंतर्कर्ण तेवढ्या वेगाने काम करीत नसल्यामुळे तात्पुरते फिरल्यासारखे वाटते. मधुमेह, रक्तक्षय, कानाला मार लागणे, सर्दी, मानेच्या मणक्यांची झीज, वार्धक्यामुळे कानाकडे रक्तपुरवठा कमी होणे, धूम्रपान, मद्यपान, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे; ऍस्पिरीनसारखी काही औषधे, उपासतापास, काही अन्न घटकांचे सेवन, काही वास याबरोबरच कानाच्या नसेच्या कर्करोगातही चक्कर आढळते. एवढेच काय, मानसिक कारणांनी अंत:करण साफ नसल्यास अंतकर्णाचे कार्य बिघडून चक्कर येऊ शकते.

धोक्याची घंटा

‘मिनिअर्स डिसीज्’ या रोगात अंतर्कर्णातील जो द्रवपदार्थ असतो त्याचा दाब वाढत असतो. यामध्ये चक्करेबरोबरच ऐकू कमी येणे. कानात घंटी वाजल्यासारखा आवाज येणे अशी लक्षणे असतात. याचे ऍटॅक वरच्यावर येत राहतात. याशिवाय चक्कर आणि मळमळ, घाम, हातापायाला मुंग्या, छातीत धडधड ही लक्षणे, चक्कर अन्य गंभीर रोगाचे लक्षण असल्याचे दर्शवते.

कारणांचा तोल सांभाळायचा ताळमेळ घाला

केवळ चक्कर हे लक्षण असल्यावर वर दिलेल्यांपैकी काही कारण घडत असल्यास ते कारण दूर केल्याने चक्कर थांबण्यास मदत होते. काही वेळा मात्र खूप शोध घेऊनही दोष सापडत नाही. अशा वेळी डॉक्टर कानाकडील रक्तपुरवठा वाढवणारी, लॅबरिंथ या यंत्रास शांत ठेवणारी काही औषधे देतील. तुमच्या डॉक्टरांकडे तुम्ही जाईपर्यंत पुढील काळजी उपयोगी पडेल.

दूरवर दृष्टीक्षेप

अचानक डोके फिरते आहे. चक्कर वाटते असे वाटल्यास डोके स्थिर ठेवून दूरवरच्या अचल गोष्टीकडे नजर रोखून ठेवा. त्यामुळे मेंदूमधील स्थैर्य रोखणार्‍या केंद्राकडे योग्य संदेश जाऊन चक्कर लवकर आटोक्यात येईल. खोलीत असल्यास सर्वात दूर असलेल्या दाराकडे, खिडकीकडे नजर लावा. प्रवासात असल्यास लांबवरच्या डोंगर राशींकडे पाहा.

तरातरा, ताडकन, तेज गतीमधील ‘त’ तरुणांसाठी

शक्यतो सर्वांनीच, विशेष करून चाळिशीच्या वरील व्यक्तींनी तरी, झोपेतून ताडकन उठू नये. प्रथम एका कुशीवर वळा, नंतर हाताच्या आधाराने बिछान्याच्या कडेला धरून हातावर भार देऊन बसा. असे काही वेळ बसून मग उभे रहा. यामुळे तीन फायदे होतात. एक म्हणजे कुशीवर वळून उठण्याने मणक्यांवर अनावश्यक ताण पडत नाही. दुसरे मेंदूकडील रक्तपुरवठा कमी होत नाही. तिसरे म्हणजे अंतर्कर्णातील लॅबरिंथला बदलत्या स्थितीचे ज्ञान घेण्यास पुरेसा वेळ मिळून ते नव्या स्थितीत योग्य असे संदेश मेंदूकडे पाठवते. उठण्याआधी  पायाची; सायकल चालवण्यासारखी हालचाल केल्यास आणखी चांगले. रस्त्यात कोणी हाक मारल्यासही झपकन मागे न वळता हळू वळून पाहावे.

पुरवठा करा पाण्याचा; अतिरेक झाल्यास मद्याचा

अतिरिक्त मद्यपानामुळे (अशा मद्यपानामध्ये बाटली पूर्ण रिकामी (रिक्त) होत असल्यामुळे त्याला ‘अतिरिक्त’ म्हणत असावेत.) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर मद्याचा कानातील लॅबरिंथवर दुष्परिणाम होऊन दोन्ही कारणांनी चक्कर येते. उन्हाळ्यात वा शारीरिक श्रम अधिक झाल्यास घाम येऊन शरीरातील पाणी कमी झाल्याने चक्कर आल्यासारखे वाटते. अशा वेळी पाणी, फळांचा रस, लिंबू सरबत, शहाळे यांचे सेवन करावे. मद्याचा शरीरातून निचरा झाल्यावर ही चक्कर आपोआप कमी होते. मानेचे काही व्यायाम, पी.टी.सारखी कवायत यांनी लॅबरिंथ व रक्ताभिसरण दोन्हींचे कार्य सुधारून चक्कर कमी होते.

डॉ. विकास गोगटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!