अग्निशमन नूतनीकरणाची साडेनऊ लाखाची बेकायदेशीर वसुली

0

जळगाव |  प्रतिनिधी :  अग्निशमन परवाना नुतनीकरण करण्याची गरज नसतांनाही शहरातील हॉटेल्स, हॉस्पीटल, उपहारगृह आणि मोठमोठ्या ईमारतधारकांकडून बेकायदेशीरित्या वसुली करण्यात आली आहे. सन २०१४-१५ ते आजतागायत साडेनऊ लाखाची वसुली केली आहे. त्यामुळे वसुल झालेल्या रकमा परत द्याव्यात, अशी मागणी नगरसेवक रविंद्र पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

शासनाच्या ३० ऑक्टोबर २०१४ रोजीच्या परिपत्रकानुसार अग्निशमन परवाना नुतनीकरण करण्याची गरज नसल्याचे अध्यादेश आहे. परंतु मनपाच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील हॉटेल्स, हॉस्पीटल्स्, उपहारगृहे आणि मोठमोठ्या इमारतधारकांकडून अग्निशमन परवाना नुतनीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली जात आहे.

सन २०१४-१५ मध्ये २ लाख २४० रुपये, २०१५-१६ मध्ये १ लाख ५४ हजार ८१२ रुपये तर सन २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत ५ लाख ९२ हजार ८९९ असे एकूण ९ लाख ४७ हजार ९५१ रुपयांची बेकायदेशीर वसुली केली असल्याचे नगरसेवक रविंद्र पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच अग्निशमन विभागाकडून नुतनीकरणाच्या नावाखाली केलेल्या बेकायदेशीर वसुलीला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. अग्निशमन विभागाकडून वसुल झालेल्या रकमा परत देण्यात याव्यात, अशी मागणी देखील नगरसेवक रविंद्र पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*