Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अखेर नगरच्या रस्त्यावरून धावणार ‘शिवनगरी’

Share

शहर बससेवेचे आज मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या वर्ष-दीड वर्षापासून नगरकरांना आणि नगरमध्ये विविध कामांसाठी बाहेरगावहून येणार्‍यांना प्रतीक्षेत असलेली शहर बससेवा ‘शिवनगरी’ या नव्याने नावाने आणि नव्या कोर्‍या बस घेऊन सुरू होत आहे. शनिवारी 6 जुलै रोजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 6 वाजता या सेवेचे उद्घाटन होणार आहे.

नगरमध्ये शहर बसची मोठी गरज आहे. महापालिकेने आतापर्यंत तीन वेळा यासाठी प्रयत्न केला. तीनही वेळा यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभिकर्ता संस्थेने काही ना काही कारण काढून बससेवा बंद केली आहे. आता दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेने ही सेवा सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सेवा बंद केलेल्या तिनही अभिकर्ता कंपनीने आर्थिक कारण देत सेवा बंद केली. असे असतानाही दिपाली ट्रान्सपोर्टने नव्या कोर्‍या बस सेवेसाठी देण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात दहा बस तयार होऊन आलेल्या आहेत. आरटीओकडील त्याची सर्व पूर्तता झाल्यानंतर काल आरटीओ या संस्थेकडे महापालिकेकडे असलेला प्रवासी टप्पा वाहतुकीचा परवाना वर्ग केला.

शहरात बस धावण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पूर्ण झालेल्या असल्याने शनिवारी या सेवेचे औपचारिक उदघाटन करण्यात येत आहे. उदघाटनाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लवकर संपल्यास रात्री किंवा रविवार सकाळपासून सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा बस असल्या तरी त्या टप्प्याटप्प्याने वाढवत तीसपर्यंत नेण्याची करारात अट आहे.

पंधरा बस वाढविल्यानंतर तोट्याच्या मार्गावर येणार्‍या तुटीच्या मोबदल्यात संस्थेला महापालिका नुकसान भरपाई देणार आहे. तसेच प्रवासी भाड्यातून संस्थेला मिळालेल्या उत्पन्नाची तपासणी महापालिकेची अधिकारी करणार असून, त्यासाठी संस्था आणि महापालिका अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात संस्थेला नुकसान झाल्याचे दिसून आले, तरच ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

नावांची कसरत
महापालिकेत भाजपची सत्ता असून, बससेवा सुरू करणारी अभिकर्ता कंपनी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्याशी संबंधित आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या महापालिकेत खडाष्टक आहे. त्यामुळे उदघाटनाच्या कार्यक्रमाला भाजपच्या कोणत्या नेत्यांना आमंत्रित करायचे, यावरून बराच खल झाल्याची चर्चा आहे. हे करताना भाजपचे इतर नेते नाराज होणार नाहीत, यासाठी अभिकर्ता कंपनीतील काहींना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांची नावे पुढे आली. हे नेते भाजपचे असले तरी शिवसेनेला जवळचे वाटतात. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना स्थान देऊन आमदार व माजी खासदारांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

रिक्षा चालकांचे आव्हान..
शहर बससेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी आर्थिक गणितासोबतच रिक्षा चालकांच्या त्रासाचाही मुख्य प्रश्‍न आहे. या त्रासाकडे राजकारण्यांनी नेहमीच मतांचे गणित म्हणून दुर्लक्ष केले आहे. बसस्थानकाबाहेर वेड्यावाकड्या रीक्षा उभ्या करून शहर बस अडविणे, रस्त्याने चालताना अडथळा निर्माण करणे, आरेरावीवर येणे असे प्रकार सातत्याने घडतात. नगरकरांना ही सेवा आवश्यक असल्याने त्यात अशा प्रकाराने खंड पडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याबरोबरच शहरातील राजकारण्यांनीही कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!