Type to search

ब्लॉग

अक्षरसाधना हीच पूजा

Share

लहानपणापासूनच मी गणेशाशी जोडलो गेलो आहे. आमच्या घराच्या आसपास गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे अनेक कारखाने होते. त्यामुळे मूर्ती घडवतानाच्या कामातले सगळे टप्पे मला माहीत होते. आधी माती चाळून चार दिवस बांधून ठेवणे, त्यानंतर माती ओली असतानाच काम करणे, गणपती साकार होताना बघणे हे बघतच मी मोठा झालो. आधी गणपतीच्या वेगवेगळ्या अवयवांचे वेगळे साचे असायचे. त्यानुसार हात-पाय-धड असे अवयव वेगवेगळ्या साच्यातून बनवले जायचे आणि नंतर त्याचे जोडकाम चालायचे. त्यानंतर तडे गेलेल्या जागी व्हाईट सिमेंट भरले जायचे, पांढरा रंग मारला जायचा, त्यानंतर वस्त्रांचा रंग स्प्रे केला जायचा, डोळे रेखले जायचे आणि सर्वात शेवटी दागदागिने अथवा मुकुटाचे गोल्डन वर्क केले जायचे. लालबाग भागात राहताना गणेशरूप साकार होतानाची ही सगळी प्रक्रिया मला तोंडपाठ होती. मूर्ती घडवण्याची प्रत्येक कारखान्याची वेगळी पद्धत मी बघत होतो. हे सगळे डोळ्यासमोर घडत असल्यामुळे मला लहानपणापासूनच गणपतीविषयी आकर्षण होते.

पुढे जे. जे. स्कूल ऑङ्ग आर्टमध्ये गेल्यानंतर स्केचिंगचा भाग आला तेव्हा गणेशाचा ङ्गॉर्म किती वैशिष्ट्यपूर्ण, आगळावेगळा आहे हे समजायला लागले. हाताचे, पायाचे, कानाचे स्केचिंग करताना हा ङ्गॉर्म सर्वात सोपा आहे, हेही प्रकर्षाने जाणवू लागले. गणपतीचा आकार हा असा एक ङ्गॉर्म आहे जो दोन वर्षांच्या मुलापासून नव्वदीच्या घरातल्या वृद्धांपर्यंत सर्वांना सहज जमू शकतो. एका रेषेने गणपती काढायचा म्हटले तरी ङ्गार अवघड पडत नाही. इतका साधेपणा असल्यामुळेच नंतरच्या काळात हा देव न वाटता त्याच्याविषयी वेगळाच आपलेपणा वाटू लागला. मुख्य म्हणजे ही माझीच नव्हे तर अनेकांची भावना आहे. म्हणूनच विविध वयोगटातल्या, विविध भाषा बोलणार्‍या, भिन्न प्रांतीय व्यक्ती या देवतेकडे आकर्षित होतात. हा देव आहे यापेक्षा माझा सुहृद आहे, सखा आहे ही भावना या प्रत्येकामध्ये असते. इतकी जवळीक असल्यामुळे गणपती विविध ङ्गॉर्ममध्ये दाखवता येतो. तो उंदराबरोबर खेळत आहे, वाचत बसला आहे अशा स्वरुपातही आपण त्याची कल्पना करू शकतो आणि त्याचे तसे रूप साकारू शकतो. अशा प्रकारे आधीच्या सिंहासनाधिष्ठित अथवा उभ्या स्वरुपातल्या गणेशाचे रूप बदलत गेल्यामुळेच तो आपल्या आयुष्यात अगदी सहजतेने प्रवेश करतो आणि नकळत आपल्यातला एक होऊन जातो. गणेश प्रतिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही आकारात सुरेखच दिसतो. दोन  ङ्गुटांपासून २५ ङ्गुटांपर्यंत त्याचा कोणताही आकार आकर्षकच दिसतो. मुख्य म्हणजे रचनेतल्या मापांमध्ये थोडाङ्गार बिघाड झाला तरी तो ङ्गार ठळकपणे दिसून येत नाही. कोणी त्याची सोंड खूप मोठी दाखवते तर कोणी दुसरा अवयव. नावीन्याच्या दृष्टीने गणेश प्रतिमांमध्ये असे अनेक बदल करता येतात, अधिकाधिक वैविध्य आणि नावीन्य शोधण्याच्या कलासक्त आणि प्रयोगशील प्रवृत्तीमुळे प्रत्येक कलाकार गणेश प्रतिमा अथवा गणेश शिल्पांमध्ये असे नानाविध प्रयोग करून बघत असतो. एखादा कलाकार गणपतीच्या कानांना सुपासारखा आकार देतो. तोही खूप शोभून दिसतो. ज्येष्ठ कलाकार विठ्ठल झाड यांनी गणेशाच्या गंडस्थळाची एक वेगळीच शैली आणली होती, तर दिनानाथ वेलिंग यांनी पंधरा-वीस ङ्गुटांची गणेशमूर्ती अंगठ्यावर उभी केली होती. चेंबूरच्या राजाचे वेगळे आकर्षण होते. कारण ती मूर्तीही अशीच वैशिष्ट्यपूर्ण होती. व्ही. शांताराम यांच्या स्टुडिओमध्येही खूप मोठ्या आकाराचा गणपती बसायचा. असे नानाविध आकारातले आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने साकारलेले गणपती बघितल्यामुळे कलाकाराचे कलाभान जागृत होतेच शिवाय मनही सुखावून जाते.

अक्षरांमधून गणपती साकारण्याचीही वेगळी मजा आहे. काही वर्षांपूर्वी मी ‘लालबागचा राजा’ हे पुस्तक केले होते. त्यामध्ये मी आरत्यांच्या अक्षरांमधून गणपतीचा ङ्गॉर्म तयार केला होता.उदाहरणार्थ चिंतामणीच्या ‘चिं’ या अक्षराला गणेशाकार दिला होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या अक्षरांमधून गणेशाकार साकार होत गेला तेव्हाही मला गणपती माझा आहे, खूप जवळचा आहे याची जाणीव झाली. असे असंख्य गणपती मी साकारले आहेत. त्यामुळेच ही देवता म्हणून मला वंदनीय आहेच त्याचबरोबर मला तो ङ्गॉर्मही खूप भावतो.

कलाकार हाताने गणेशाकार साकारतो, मूर्ती घडवतो, माझ्यासारखा कलाकार अक्षरांच्या माध्यमातून तो साकारतो तेव्हा ती गणेशाची साधनाच असते. असे असल्यामुळेच गणपतीची वेगळी पूजा करण्याची गरज भासत नाही. केवळ चित्रकार अथवा शिल्पकारच नव्हे तर संगीतकार, गीतकार, गायक आदी मंडळीही आपापल्या कामातून कलेच्या या अधिपतीची पूजाच मांडत असतात. अशा प्रकारे एखाद्या कलाकाराची पूजा संपन्न होताना त्यांची तल्लीनता, एकाग्रता, एकरुपता बघण्याजोगी असते. हे वैशिष्ट्य असल्यामुळेच गणपती भेदाभेदांच्या पलीकडे पोहोचलेली देवता आहे, असे आपण म्हणू शकतो. ही सहजताच गणपतीला अन्य देवतांपेक्षा वेगळे बनवते. गणपती हा मातीचाच असायला हवा, असे मला वाटते. कारण ही पार्थिव मूर्ती आहे. ओढून ताणून गणेशाकार साकारण्याची काही गरजच नाही. हा आकार इतका सहजसुंदर आहे की तो एखाद्या दगडातही सापडतो. माझ्याकडे असाच एक दगड आहे ज्यात गणेशाचा भास होतो. पूर्वीचे स्वयंभू गणपतीही याच धाटणीचे आहेत. त्यांना आखीव- रेखीव, स्पष्ट दिसणारे हात-पायादी अवयव नाहीत. तो केवळ ङ्गॉर्म आहे. इतकेच कशाला जास्वंदीचे ङ्गूल उलटे करून पाहिले तरी त्यात गणपतीचा ङ्गॉर्म दिसतो. त्यामुळेच सहजसुंदर आकाराशी खेळ करू नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

या सगळ्या उत्सवात, रूपात पारंपरिकता जपणेही मला महत्त्वाचे वाटते. ङ्गॅशन ही आजच्या घडीपुरती असते. तिचे शेल्ङ्ग लाईङ्ग अल्पकाळाचे असते. उलटपक्षी परंपरा ही अनेक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली असते. आधुनिकता ही काळाची गरज आहे, ती अंगीकारण्यात काही गैर नाही हे सत्य आहे. मात्र याचा अर्थ परंपरा अव्हेरायच्या असाही होत नाही. टिळकांनी सुरू केलेला, मुंबईतला पहिला गणेशोत्सव असणार्‍या केशवजी नाईक गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची उंची आज इतक्या वर्षांनंतर एक सेंटीमीटरने वाढलेली नाही की कमीही झालेली नाही. तरीदेखील असंख्य भक्तगण दरवर्षी या गणेशाच्या पायी नतमस्तक होण्यास येत असतात. अपार श्रद्धेने गणेशाला वंदन करतात. त्यामुळेच परंपरा जपणे हे मागासलेपणाचे लक्षण अजिबात नाही. ती एक मनस्वीता आहे. भावनिक आणि कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास प्रत्येक गणेश प्रतिमा आपल्याला खूप काही देऊन जाते.

आमच्याही घरी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी सगळी भावंडे एकत्र येतो. यानिमित्ताने नवी पिढीही एकत्र येते. आनंदाने समारंभात सहभागी होते. दर तीन वर्षांनी एकाकडे अशा प्रकारे गणपती बसवला जातो. त्यावेळी घरातले सगळे सदस्य, एकमेकांचे स्नेही, मित्रमंडळी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. घरीदेखील कलात्मक गणपती साकारण्याकडे माझा कल असतो. एका वर्षी मी गणपतीवर छानशी कॅलिग्राङ्गी केली होती. हा गणपती विसर्जनासाठी घेऊन गेलो तेव्हा अनेकांनी तो विसर्जन न करण्याचा सल्ला दिला. अनेकांना तो खूप भावला. मात्र आधीचे विसर्जन केल्याशिवाय दुसरे घडत नाही. नावीन्य पाहायला मिळत नाही. सर्जनशीलता जन्म घेत नाही. आकार घेणारी आणि नंतर विसर्जित होणारी गणेशमूर्ती आपल्याला हाच संदेश देत असते. हा संदेश प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा.

अच्युत पालव, प्रसिद्ध सुलेखनकार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!