Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोलेतील दुकानांत पाणी घुसले

Share

संगमनेर, राहुरी, नगरलाही पावसाने झोडपले

अकोले, संगमनेर (प्रतिनिधी)- अकोले तालुक्याला सायंकाळ पासून सर्वदूर मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरातील सर्वच रस्त्यांवर नदी सदृश स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.शहरातील तळमजल्यातील सर्वच दुकानांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.अनेक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या मुसळधार पावसाने नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. अकोले शहरातील महात्मा फुले चौक ते शेकईवाडी दरम्यान तळमजल्यातील दुकाने पाण्याखाली गेली आहेत. अकोले शहरात पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातही विविध गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

भंडारदरा वार्ताहराने कळविले की, भंडारदरा व पाणलोटातही तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होती. संगमनेर शहर व तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू होता. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. वाहनधारकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. ग्रामीण भागातही पावसाचा जोर होता.

राहुरी प्रतिनिधीने कळविले की, राहुरी शहर व तालुक्यात रात्री 9 वाजल्यापासून संततधार सुरू होती. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले होते. ग्रामीण भागात कांदा झाकून टाकण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नगर शहर व परिसरालाही पावसाने झोडपून काढले रात्री 10 वाजेपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नगरकरांना अनेक अडचणींशी सामना करावा लागला. नगरमधील टांगे गल्लीतील जुन्या कोर्टासमोर असलेला ठाणेकरांच्या वाड्यात भिंत कोसळून एक वृध्दा जखमी झाली.
शिर्डी व परिसर, अस्तगाव, राहाता या ठिकाणीही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नेवाशा तालुक्यातील गोदाकाठी जोरदार पाऊस झाला. रात्री 11 च्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊश सुरु झाला होता. दरम्यान उक्कलगाव, एकलहरे परिसरात मुसळधार पाऊस झाला. शेतांमध्ये पाण्याचे तळी साचले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!