अंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णवेध

0
चँगवॉन । दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. 150 पैकी 140 गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्ण पदकावर नाव कोरले. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली.

मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखले.26 वर्षीय अंकुरने शुटऑफमध्ये चीनच्या यियांग यांगचा पराभव केला. 75 फेर्‍यानंतर अंकुर आणि यियांग यांचे गुण 140 असे समसमान झाले होते. अंकुरने पाचव्या फेरीत पैकीच्या पैकी 30 गुणांची कमाई करताना स्वतःला सुवर्णपदकाच्या शर्यतीत कायम राखले.

तिसर्‍या स्थानावर असलेल्या स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेज ओलेंनिकनेही 140 गुणांची कमाई केली होती. त्यामुळे शुटऑफमध्ये अंकुरने चार लक्ष्य अचूक साधत सुवर्णपदक जिंकले. यियांगला तीन, तर ओलेंनिकला एकच लक्ष्य साधता आला आणि त्यामुळे त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सांघिक गटात भारताला 409 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात अंकुरसह असाब मोहम्मद, शार्दूल विहान यांचा समावेश होता. सांघिक गटात इटली ( 411) आणि चीन ( 410) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.

LEAVE A REPLY

*