Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedलोककलेचा सुवर्णकाळ : राजेंद्र उबाळे

लोककलेचा सुवर्णकाळ : राजेंद्र उबाळे

– राजेंद्र उबाळे

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत मानाचा तुरा खोवण्यात नाशिक जिल्ह्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. नाशिक हा लोककलेचा वारसा जतन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख इथल्या दिग्गज लोककलावंतांनी आपल्या दर्जेदार कला प्रकारांतून महाराष्ट्रच नव्हे तर देशाला करून दिली आहे.

- Advertisement -

सन 1970 ते 80चा कालखंड जिल्ह्यात सांस्कृतिक रेलचेलीचा व लोककला चळवळीचा ‘सुवर्णकाळ’ म्हणावा लागेल. कारण या काळात मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना आपला दर्जेदार अभिनय, नृत्य, संगीत आणि नाट्याच्या जोरावर येथील कलावंतांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

लोककला ही कलावंताच्या अंगकृतीतून उत्फूर्तपणे प्रसवणारी निसर्गदत्त देणगी आहे. निसर्गाने मानवाला बहाल केलेल्या देणगीरूपी कलेचा प्रत्यय खर्‍या हाडाच्या कलाकाराच्या कलाविष्कारातून येतो. भारतात विविध राज्यांत आणि प्रांतात त्या-त्या रूढी-परंपरांनुसार तेथील सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे. महाराष्ट्राला विविधांगी लोककलांची विविधता लाभली आहे. या लोककलांचा अनेक पिढ्यांनी वारसा जपून ठेवला आहे.

लोककलेची ताकद इतकी मोठी आहे की, तिच्या सादरीकरणाने आत्मभान हरपून जाते. लोककलेचे विविध प्रकार आहेत. भजन, कीर्तन, भराड, ललित, भारूड, पोवाडे, शाहिरी, वासुदेव, नंदीवाले, बहुरूपी दशावतार, गोंधळ, जागरण, गण, गवळण, बतावणी, लावणी, लोकनाट्य, कटाव, तमाशा, ढोलकी फड, जात्यावरील ओव्या, झिम्मा-फुगडी, लोकगीते, इत्यादी. परंतु महाराष्ट्रातील अस्सल लोकप्रिय असलेला लोककला प्रकार म्हणजे लोकनाट्य तमाशा होय.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत मानाचा तुरा खोवण्यात नाशिक जिल्ह्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. नाशिक हा लोककलेचा वारसा जतन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख इथल्या दिग्गज लोककलावंतांनी आपल्या दर्जेदार कला प्रकारांतून महाराष्ट्रच नव्हे तर देशाला करून दिली आहे.

सन 1970 ते 80चा कालखंड जिल्ह्यात सांस्कृतिक रेलचेलीचा व लोककला चळवळीचा ‘सुवर्णकाळ’ म्हणावा लागेल. कारण या काळात मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना आपला दर्जेदार अभिनय, नृत्य, संगीत आणि नाट्याच्या जोरावर येथील कलावंतांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. महाराष्ट्रात 1924 साली ऑल इंडिया रेडिओ आणि 1965 मध्ये टेलिव्हिजन सुरु झालं. तरी मनोरंजनाची ही साधने प्रत्येकाकडे उपलब्ध नव्हती. आर्थिक परिस्थिती बरी असणार्‍यांकडेच होती.

जिल्ह्यात 1970 ते 80 च्या दशकात लोकांचे निखळ मनोरंजन करण्याचा वसा हाती घेतला तो स्थानिक लोककलावंतानी! त्यांनी लोकरंजनासाठी कला पार्टी व लोकनाट्य मंडळे सुरु केली. त्यात शाहीर प्रताप परदेशी आणि सहकारी (नाशिक), गजाभाऊ बेणी आणि सहकारी (नाशिक), शाहीर बाजिन्दा, बाजिन्दा आणि पार्टी (गांधीनगर), हिराबाई व राधाबाई नाशिककर लोकनाट्य कला मंडळ (नाशिक), शाहीर चंद्रकांत पवार आणि सहकारी (सी के पवार),( गांधीनगर) शाहीर अशोक पगारे (सहकारी आणि पार्टी, गोरेवाडी), शाहीर पुंडलिक केदारे आणि पार्टी (नाशिकरोड).

बबन घोलप आणि सहकारी (सप्तशृंगी थिएटर्स, देवळाली गाव), शाहीर दत्ता शिंदे आणि सहकारी (विहितगाव गाव), शाहीर जगन नागरे (नवरंग मेळा, देवळाली गाव), शाहीर पंडित रिकामे (सप्तरंग लोकनाट्य मंडळ, विंचूर), शाहीर चांद अहमद लोकनाट्य मंडळ, (नाशिक रोड), शाहीर हरीश जाधव आणि सहकरी, (लोकरंग लोकनाट्य मंडळ, सिन्नर फाटा), शाहीर दिंडे आणि सहकारी (नांदूरगांव).

शाहीर ज्ञानेश खरे आणि सहकारी (एकलहरे), शाहीर हिरामण जाधव आणि सहकारी (ओझर), शाहीर वसंतराव नाईक आणि सहकारी व शाहीर स्वप्नील डुंबरे आणि सहकारी (सिन्नर), शाहीर सुरेश आहेर आणि सहकारी (ओझर), शाहीर बाळासाहेब भगत आणि सहकारी (घोटी) यांचा मोलाचा वाटा आहे.

या कलावंतांनी स्वतःचे संगीत मेळे, संगीत पार्टी, लोकनाट्य मंडळे सुरु केल्यानंतर कलावंतांची जमवाजमव, त्यांच्या तालमींसाठी जागा उपलब्ध करणे, स्त्री नृत्यांगना बुक करणे, त्यांच्या राहण्या-जेवण्याची तसेच गाडी, पेटी, ढोलकी, तुणतुणे, ड्रेपरी इत्यादींची व्यवस्था करणे, कलावंत नाराज होऊ नयेत वा पार्टी सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांची मर्जी सांभाळणे, त्यांच्याकडून तालमी करून घेणे हे कसब पार्टी चालवणार्‍याला दाखवावे लागे.

त्या काळात स्थानिक कार्यक्रमातून मिळणारी बिदागी जेमतेम असायची. म्हणजे तीनशे ते पाचशे रुपये! कार्यक्रम तालुकास्तरावर किंवा तालुका सोडून असला तर एक हजार ते पंधराशे रुपये इतकी बिदागी मिळायची. कार्यक्रम झाल्यानंतर यशस्वी कार्यक्रम केल्याचा आनंद कलावंतांच्या चेहर्‍यांवर दिसून यायचा. कारण कार्यक्रमाच्या तालमी सगळे मन लाऊन करीत. कलावंतांच्या व स्त्री नृत्यांगनांच्या बिदाग्या देताना पार्टी मालकाला हात उसणवार पैसे घेणे व प्रसंगी घरातील वस्तू गहाण ठेवण्याची वेळ येत असे.

कार्यक्रमासाठी एक-दुसर्‍याच्या ओळखीने पार्टीचे मालक नृत्य व अभिनयासाठी नाशिक, जामखेड, सिन्नर, जळगाव, शिरूर, घोडनदी, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे, बार्शी, शेलू आदी ठिकाणी जाऊन दहा दिवसांच्या कार्यक्रमांसाठी दोन-दोन महिने आधी नृत्यांगना बुक कराव्या लागत.

कार्यक्रमात गण, मुजरा, गवळण, रंगबाजी (बतावणी), कटाव व वग-लोकनाट्य अशा बाजाचे सादरीकरण केले जाई. लोकनाट्याचे विषय सामाजिक व ऐतिहासिक असत. त्यातून विनोद निर्मिती व प्रबोधन करण्याचे काम कलावंत करीत. गणपती, नवरात्रच्या दोन-दोन महिने आधी नाशिक, ओझर, गांधीनगर, गोरेवाडी, सिन्नर फाटा, विहितगाव, देवळालीगाव सिन्नर, दसक, जेलरोड आदी भागात दिवसरात्र हे कलावंत सरावात मग्न असत. त्या काळात फक्त एक पाय पेटी (पुढे हार्मोनियम) आणि ताल, खंजेरी, तुणतुणे इतक्याच मोजक्या वाद्यांवर आणि ढोलकीच्या जादुई कडकडाटाने त्याकाळी लहानांपासून थोरांपर्यंत ताल धरायला लावला.

गणेशोत्सव, नवरात्र छोटया-मोठ्या कार्यक्रमांनिमित्ताने दहा-दहा पंधरा-पंधरा दिवस कार्यक्रम होत, पण त्या बदल्यात मंडळांकडून मिळणारी बिदागी नाममात्र असे. त्यातून कोणालाच पुरेसे मानधन देणे शक्य होत नसे. तरीही त्या तोकड्या बिदागीवर कार्यक्रम करण्याची इच्छा या कालवंतांना स्वस्थ बसू देत नव्हती, पण या कलावंतांना खर्‍या अर्थाने हक्काचा रंगमंच कोणी उपलब्ध करून दिला असेल तर तो महापुरुषांच्या जयंत्या करणारी मंडळे, तसेच गणपती व नवरात्र मंडळांनी!

रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलेच्या, विनोदी आणि कसदार अभिनयाच्या जोरावर खर्‍या अर्थाने अधिराज्य गाजवले ते शाहीर बाजिन्दा, शाहीर अशोक पगारे, विजय पगारे ,मेघराज बाफना, गजाभाऊ बेणी, शाहीर प्रताप परदेशी, शाहीर माधवराव गायकवाड, सुधाकर खरात, शाहीर दत्ता शिंदे, विनोदाचे बादशहा प्रकाश नन्नावरे, सलीम पठाण, सुरेश कुलथे, प्रभाकर पवार, शाहीर चंद्रकांत खरात, शाहीर पुंडलिक केदारे, बबनराव घोलप.

शाहीर कमलाकर मुळे, जगन नागरे, प्रकाश रहाटळ, देवकर, भास्करराव थोरात, विजय कोरडे, माधव आल्हाट, श्रावण चंद्रमोरे, हिरानंद सोनार, शाहीर मोहन पगारे, गणेश साळवे, रमेश भवार, शाहीर खंबाळकर,भास्करराव साळवे, हरीश जाधव, आर. एल. मोरे, रमाकांत वाघमारे, चंद्रकांत जाधव, रवी गांगुर्डे, बबन उन्हवणे, गणेश उन्हवणे, रमेश जोहोरे, बाळकृष्ण मंडलिक, चांद शेख, अहमद शेख लतीफ पठाण तर तितक्याच मोलाची साथ करणारे कवी जयराज उन्हवणे, रंगराज ढेंगळे.

प्रेमानंद दोंदे, विनायक पाठारे, नृत्य संगीत साथ करणारे पोपट केदारे, शिवाजी निकम, भारत भालेराव, युसूफ शेख, चंदा बागूल, मदन बागूल, ढोलकी सम्राट बाबुराव शिंदे, कृष्णा शिगवण, शिवराम पवार, दादा घाटे, रंजन बर्वे, मधू गांगुर्डे, तुकाराम जाधव, अनिल शिंदे, अनिल जगताप, गायक व नृत्यांगना दातारबाई, सुशीला हंडोरे, मंदा कटारे, मेरी मनतोडे, हिराबाई व राधाबाई नाशिककर, राजश्री अग्रवाल, उषा गंगावणे इत्यादी.

कुंकवाचा धनी, माझं गांव माझी सत्ता, कुबेराचं धन, माझ्या प्रीतीच्या फुला, आता काय करायचं, बाईचा गोंधळ, गावाची धांदळ, यमाची रजा, हवालदाराची मजा, या रात्र आपलीच आहे, खुर्चीभोवती फिरते दुनिया, असं कधी घडलंच नव्हतं, राजाला पडलंय सपान आदी लोकप्रिय वगनाट्ये आजही जुन्या लोकांच्या मनात घर करून बसली आहेत.

हळूहळू या लोकनाट्य कला मंडळांच्या नाशिक जिल्हा व जिल्ह्याबाहेर अगदी मुंबई-पुण्याच्या कलाकारांशीही ओळखी झाल्या व प्रसिद्धी मिळाली. या कलावंतांनी आपल्या अभिनयाची छाप पाडून सातपूर, विहितगाव, सौभाग्यनगर, पाथर्डी, देवळाली गांव, आयएसपी-सीएनपी वेल्फेअर हॉल, नाशिकरोड, एकलहरा, सिडको, ओझर, उंबरखेड, निफाड साखर कारखाना, सिन्नर, वावी, इगतपुरी कळवण, सटाणा, मालेगाव, मनमाडसह कोपरगाव, प्रवरानगर, श्रीरामपूर, अंदरसूल, चाळीसगाव आदी ठिकाणी आपल्या कसदार अभिनयातून नाशिकची एक वेगळी ओळख निर्माण केली.

नाशिकला मुंबईच्या कलावंतांचा कार्यक्रम असताना अचानक अडचण आली. त्यांच्या कार्यक्रमात शाहिरी व अभिनय करून नाशिकच्या शाहीर दत्ता शिंदे व कलावंतांनी त्यांची अडचण सोडवली. म्हणजे नाशिकच्या कलावंतांनी मुंबई, पुण्यासह अनेक कला पार्ट्यांना अडचणीच्या काळात मदत करून नाशिकचे नाव मोठे केले.

अतिशय हलकीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत गावोगावी फिरून आपल्या कलासाधनेच्या जोरावर रसिक श्रोत्यांच्या मनात कायमचे घर केलेल्या या कलापथकांच्या आणि या कलावंतांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा जपला तो पुढच्या पिढीने! या कलावंतांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून परंपरेने ही कला पुढे चालू ठेवली ती नाशिकमधील पुष्कराज थिएटरचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे, ओझरचे दिवंगत शाहीर हिरामण जाधव, घोटी-इगतपुरीतून शाहीर बाळासाहेब भगत, शाहीर उत्तम गायकर यांनी. त्यांच्यासह अनेक कलावंत ही चळवळ पुढे चालवत आहेत.

राज्य नाट्य, कामगार नाट्यांबरोबरच लोककलेला पुनर्जीवित करण्यासाठी सुनील ढगे यांनी पुष्कराज थिएटरची निर्मिती केली. त्यांनी केलेल्या लोककला प्रवासाची सुरूवातही अतिशय खडतर परिस्थितीत झाली. एक ढोलकी आणि एक हार्मोनियम या वाद्यांसोबत लोककला जोपासण्याचा श्रीगणेशा झाला.

अपुरे तंत्रज्ञान, मर्यादित साधने असताना आपल्या निष्ठावान कलावंतांना बरोबर घेऊन लोककलेच्या व्यावसायिक निर्मितीत या रात्र आपलीच आहे, यमाची राजा हवालदाराच्या मजा, विच्छा माझी पुरी करा, अशी रंगली रात्र, रात्र धुंदीत ही जागवा या लोकनाट्यांचे व्यावसायिक सादरीकरण केले.

तर महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आधारित ढोलकीचा कहर लावणीचा बहर, महाराष्ट्राचा बाणा, महाराष्ट्राची लावणी धारा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राची लोककला, ऑर्केस्ट्रा एस कुमार, अप्सरा आली रे आली इत्यादी कार्यक्रमांची व्यावसायिक निर्मिती केली.

त्यांना तितक्याच निष्ठेने साथ दिली ती ढोलकीसाठी राजेंद्र उबाळे, हार्मोनियम शिवाजी निकम, शाहिरी रवी बराथे, शाहीर सुनील गांगुर्डे, संजय साळवे, हरीश परदेशी, संतोष पवार, राजेंद्र पवार, सुरेश साळवे, ज्योती धुमाळ, अलका अंबोरे, अतुल गांगुर्डे, आनंद त्रिभुवन, देवानंद पाटील, रवींद्र वावीकर, संजय भालेराव, प्रवीण पोतदार यांनी.

कार्यक्रमांचा दर्जा उंचावण्यासाठी सुनील ढगे यांनी अमूलाग्र बदल केले. हार्मोनियमच्या साथीला ऑर्गन, काँगो, ऑक्टोपॅडचा वापर केला. रंगमंचवरील सेटचा वापर, अत्याधुनिक साउंड, मिक्सर लाईटस व स्मोक आदींचे नवनवीन प्रयोग केल्यामुळे कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्यास मदत झाली.

नाशिकमध्ये लोककलावंतांची खाण तयार करणार्‍या निर्मात्यांनी त्या काळात अविरत मेहनत घेऊन कलेची साधना केली. त्यांनी अतिशय परिश्रमाने नाशिकच्या बाहेर या कलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. नाशिकची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्याच सहवासाने प्रेरित होऊन पुढे लोककलेच्या माध्यमातून सुनील ढगे यांनी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर बनारस, भोपाळ, बडोदा जयपूर, पटना, दिल्ली, हिमाचल प्रदेश (कुलुमनाली) या ठिकाणी विविध कलामहोत्सव, गंगा महोत्सव, लोकउत्सव, दशहरा महोत्सव, फुलवालोंकी सैर, गणेश फेस्टिवल, कॉमनवेल्थ युथ गेम्स आदी ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आंतरराज्य देवाण-घेवाण महोत्सवातून ही लोककला महाराष्ट्राबाहेर नेली व नाशिकचे नाव भारतात मोठे केले. ही जिल्ह्यासाठी सार्थ अभिमानाची बाब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या