स्वप्न ‘स्मार्ट’ नाशिकरोडचे! : उन्मेष गायधनी

Nashik Road
Nashik Roadस्वप्न ‘स्मार्ट’ नाशिकरोडचे!

- उन्मेष गायधनी

(लेखक सिटी प्लानर व टेक्नो लिगल कन्सलटंट आहेत.)

‘स्मार्ट सिटी’त सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि संतुलित विकास घडेल अशी अपेक्षा आहे. हे साध्य करताना पायाभूत सुविधांचा विकास, विकास आराखड्यातील तरतुदींचा विकास साधून नागरिकांचे जीवनमान सुधारण्याची कल्पना आहे. नाशिकरोडचा विचार केला तर जवळपास 50 टक्के नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. भूतपूर्व नाशिकरोड-देवळाली नगरपालिका असताना जो विकास झाला त्या तुलनेने मनपा काळात बकालपणा वाढला आहे. आता हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे.

नाशिक रोड :

विकासाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारची गाडी वेगाने चालू लागली. सत्ता मिळाल्या-मिळाल्या देशाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे जाहीर झाल्या. राजापासून रंकापर्यंत सगळ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या.

शहरी नागरिकांसाठी ज्या विविध योजना तयार केल्या गेल्या; त्यातील ‘स्मार्ट सिटी’ ही सर्वात प्रभावी आणि महत्त्वाची योजना आहे. त्यात शहरी लोकांचे कल्याण करण्याची क्षमता आहे. स्वातंत्र्यापासून शहरी नागरिक दुर्लक्षित आहेत, अशी भावना सामान्यतः जनतेच्या मनात आहे.

तीच नस पकडून ‘स्मार्ट सिटी’ योजना पहिल्याच अर्थसंकल्पात जाहीर केली गेली. भारतातील नागरीकरण फार झपाट्याने वाढले. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी केवळ 25 टक्के लोक शहरात राहत होते. म्हणून ‘खेड्याकडे चला’ असे महात्मा गांधी नेहमी म्हणत.

ऐंशीच्या दशकानंतर इतका झपाट्याने बदल झाला की आता 50टक्के लोक शहरात वास्तव्यास आहे. ग्रामीण भागाने त्यांच्या जगण्याच्या समस्या सोडवल्या नाहीत. म्हणून लोकांचे लोंढेच्या लोंढे मोठ्या अपेक्षेने शहरात डेरे दाखल झाले.

ग्रामीणपेक्षा शहरातील आयुष्य आरामशीर आहे, अशी भावना रुजल्यामुळे रोजच्या रोज ग्रामीण जनता शहराकडे आकर्षित होत आहे. करोना संकटात जीवाच्या आणि जगण्याच्या भीतीने हतबल झालेल्या मजुरांनी आपल्या गाव-खेड्याची वाट धरली असली तरी नव्याचे नऊ दिवस सरताच त्यांना पुन्हा शहराकडे परतण्याचे वेध लागले आहेत.

आपल्या घटनेत प्रत्येक नागरिकाला कुठेही वास्तव्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असल्याने परतणार्‍या जनतेला सामावून घ्यावे लागेल. मुळात या मंडळीच्या पलायनामागची कारणे शोधून त्यावर त्वरित उपाय शोधणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्मार्ट सिटी’ योजनेचा विचार केल्यास नाशिकरोडचा सुयोग्य विकास करता येईल.

सर्वसमावेशक विकास व्हावा

शहरी भागाचा एकात्मिक विकास साधण्यासाठी राजीव गांधी सरकारने ‘मॉडेल सिटी’ योजना तयार केली होती. पण ती लालफितीत अडकली आणि त्यामुळे, त्यात निवडलेल्या शहरांचा विकास होण्याऐवजी ती भकास झाली. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनी मोदी सरकारने पुन्हा त्यात लक्ष घातले ते फार बरे झाले. मागील योजनेच्या अंमलबजावणीतील चुका टाळण्यासाठी सर्वात प्रथम शहरांच्या निवडीसाठी एक स्पर्धा घेतली.

त्यामुळे पारदर्शकता तर आलीच; शिवाय मोठ्या प्रमाणावर खासगी तज्ञांचे मार्गदर्शन घेता आले. ‘स्मार्ट सिटी’ची शब्दरूपी व्याख्या केंद्र सरकारने तयार केली नाही. कारण प्रत्येक शहराची भौगोलिक रचना आणि अस्तित्वातील नागरी सुविधा यावर पुढील विकास अवलंबून आहे. म्हणून तो एका व्याख्येत मांडणे शक्य नाही.

‘स्मार्ट सिटी’त सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि संतुलित विकास घडेल अशी अपेक्षा आहे. हे साध्य करताना पायाभूत सुविधांचा विकास, विकास आराखड्यातील तरतुदींचा विकास साधून नागरिकांचे जीवनमान सुधारण्याची कल्पना आहे.

नाशिकरोडचा विचार केला, तर जवळपास 50टक्के नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. भूतपूर्व नाशिकरोड-देवळाली नगरपालिका असताना जो विकास झाला त्या तुलनेने मनपा काळात बकालपणा वाढला आहे. आता हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे.

मार्गक्रमणासाठी उद्दिष्टे

1. एकात्मिक विकास करण्यासाठी बाजारपेठेचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना सर्व सुविधा पायी चालण्याच्या अंतरात उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यामुळे नागरिकांना प्रवास टाळता येईल. करोना लॉकडाऊनमध्ये याचे महत्त्व सर्वांना पटले आहेच. शिवाय असे केल्याने प्रदूषणदेखील कमी होईल.

2. नाशिकरोडमध्ये झोपडपट्टी आणि गुंठेवारी फार जोरात आहे. त्यामुळे एकेकाळी नंदनवन असलेली ही नगरी आज विद्रूप झाली आहे. अतिक्रमण निर्मूलन कटाक्षाने करून प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे लागेल. प्रधानमंत्री आवास योजनेने आजपर्यंत नाशिकरोडला हुलकावणी दिली आहे, पण आता यालाच प्राधान्य द्यावे लागेल.

3. परिसराचा विकास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. सामान्यतः माणसाला घरापासून या सुविधेपर्यंत पायी जाता आले पाहिजे. त्यासाठी विकास आराखड्यातील रस्ते तातडीने साकारायला हवेत.

4. नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी सर्व खुल्या जागांचा विकास कालबद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे. या जागांवरील अतिक्रमणे काढून मूळ उद्देश सफल होईल, अशी रचना तयार करावी.

5. नाशिकरोडला रेल्वे स्टेशनचे वरदान आहे. नाशिक शहरातील हे एकमेव स्थानक असल्याने प्रत्येक पर्यटकाला नाशिकरोडला यावेच लागते. परिसरातील पर्यटनस्थळे सुयोग्यपणे विकसित करून येणार्‍या पाहुण्यांच्या विरंगुळ्यासाठी सुविधा उपलब्ध केल्यास अर्थव्यवस्थेसदेखील बळकटी मिळेल.

6. भूतपूर्व नाशिकरोड देवळाली नगरपालिकेची एक सुंदर नगरी म्हणून स्वतंत्र ओळख होती. ती आता संपुष्टात आली आहे. सर्व घटकांनी प्रामाणिक प्रयत्न करून, परिसरातील बकालपणा आणि गुंडगिरी मोडून काढली पाहिजे. पाहुण्यांप्रती आदर भाव आणि त्यांचे वास्तव्य सुखकारक केल्यास आपल्याला सुगीचे दिवस येतील.

‘स्मार्ट सिटी’कडून अपेक्षा

‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना नाशिकरोडकडे दुर्लक्ष झाले. नाशिक शहराची व्याप्ती संकुचित केली गेली. म्हणून नाशिकरोड, सिडको, सातपूर यांचा विचार केला गेला नाही. त्यामुळे नव्याने नियोजन करताना मूळ उद्देशातील सर्व सुविधा या भागात निर्माण करणे क्रमप्राप्त आहे.

24 तास स्वच्छ पेयजल पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, आधुनिक शिक्षण, सुनियोजित आणि रुंद रस्ते, सांडपाणी न मलजल प्रक्रिया केंद्र, पावसाळी पाण्याचे नियोजन, घनकचरा व्यवस्थापनेचे आधुनिकीकरण, झोपडपट्टी निर्मूलन, सार्वजनिक बगीचे, वस्तूसंग्रहालय, खेळाची मैदाने, अभ्यासिका आणि ग्रंथालये, हातावर पोट भरणार्‍या स्थलांतरित मजुरांसाठी रात्र निवारागृह, खुले नाट्यगृह आदींचा समावेश अनिवार्य ठरेल.

उपाययोजना

1. नाशिकरोडचा पूर्व भाग 2017 च्या विकास आराखड्यापर्यंत शेती झोनमध्ये असल्याने दुर्लक्षित राहिला आहे. नाही म्हणायला मोठ्या प्रमाणात गुंठेवारी झाली आहे. परंतु अजूनही बहुतेक क्षेत्र अविकसित असल्याचा फायदा उचलून या भागात ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट करावी. संपूर्ण आधुनिक विकास साधल्यामुळे संपूर्ण परिसराची कायापालट होईल. मिळकत धारकांना जास्तीचा भाव मिळेल आणि रेल्वेने येणार्‍या पर्यटकांना नव्या नाशिकची ओळख होईल.

2. देवळाली, चेहेडी, दसक, पंचक, विहितगाव येथील गावठाणे एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यासाठी रेट्रोफिटिंगची संकल्पना राबवण्याशिवाय अन्य पर्याय नाही. यात अस्तित्वातील सोयी-सुविधांचे आधुनिकीकरण तर होईलच, पण गावठाणात राहणे सुखकर होईल.

3. नगराची मुख्य बाजारपेठ आणि जुन्या वस्त्या यांचा पुनर्विकास करताना रस्त्यांना अतिरिक्त रुंद करणे, वाहनतळांची सुविधा निर्माण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी नगरच्या हरितीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. रस्त्यावर स्मार्ट लायटिंग, स्मार्ट कॅमेरा आदींचा समावेश करावा.

4. संपूर्ण परिसराचा एकत्रित विकास साधण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत धोरण ठरवणे आवश्यक आहे.

आर्थिक नियोजन

नाशिकरोड परिसराचा मूळ स्मार्ट सिटी धोरणात अत्यल्प समावेश आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेतून आर्थिक निधी मिळेल ही शक्यता संपुष्टात येते. नाशिकरोडमधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कामी एकत्रित संघर्ष करणे उपयुक्त ठरेल. मनपाच्या सर्व नाड्या मध्य नाशिकमध्ये असल्याने शिताफीने निधी मिळवावा लागेल. आपल्या खासदारांनी कधी एकेकाळी नाशिकरोड प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकून आपले उद्दिष्ट साधावे. करोना संकटात निधी मिळवणे कठीण काम आहे असे न समजता कसोशीने प्रयत्न करावा लागेल. केंद्र शासनाच्या अमृत योजना, स्वच्छ भारत योजना, हृदय योजना, रामायण सर्किट आदींमधील निधी वळवण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकावी.

नाशिकरोडला ‘स्मार्ट’ करायच्या प्रयत्नात लोकसहभाग जास्तीत जास्त ठेवावा लागेल. शेवटी म्हणतात ना की ‘जे राव ना करी ते गाव करी’! स्थानिक नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारदरबारी वेळोवेळी भेटून आपली मागणी रेटावी लागेल. एकविसाव्या शतकातील दोन दशकांचा काळ संपला आहे, आता येणारा काळ नाशिकरोडचा असेल यात शंका नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com