तणाव मुक्तीसाठी योग आवश्यक – दराडे; पोलीस ग्रामिण मुख्यालयात योगदिन

0

नाशिक। पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोणत्याही क्षणी सतत सज्ज राहावे लागते. घडणार्‍या प्रत्येक घटनेचा ताण कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. सततची धापळ कामातले आव्हान याचा परिणाम आरोग्यावर होत असतो.

या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी व कामातील आनंद मिळविण्यासाठी पोलीसांना योग आवश्यक आहे. यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दररोज योगासने करून योग आपल्या जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दराडे बोलत होते. यावेळी पतंजली योग विद्यापीठाचे प्रशिक्षक संतोष शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी योगाचे धडे गिरवले.

दराडे म्हणाले, सततचा बंदोबस्त, मोर्चा आणि विविध गुन्ह्यांचा तपास यात व्यग्र असलेल्या पोलिसांना उसंत आणि विश्रांती नसते़ त्यामुळे दैनंदिन जीवनात मनाची एकाग्रता वाढवून इतर अनेक फायदे देणार्‍या योगासाठी अगामी काळात उमक्रम राबविण्याचे अश्वासन त्यांनी दिले.

पतंजली योग पिठाचे प्रशिक्षक संतोष शेवाळे यांनी योगशास्त्रातील योगाचे यमद – नियम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे समजवून सांगितली तसेच नियमित सरावामुळे ताणतणाव मुक्ती, मानसिक शांतता, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ असे अनेक फायदे सांगितले़ दररोज योगासने करावीत असे आवाहन करून विविध योगासनांबाबत मार्गदर्शन केले. योगप्रशिक्षक संजय शेवाळे यांच्यासह एम. एम. उमदी आणि बंगळुरू येथील प्रशिक्षिका सरिता संत यांनी योगाचे धडे दिले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, मुख्यालय उपअधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले, मुख्यालय राखीव निरीक्षक सुभाष डंबाळे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस कुटुंबीय, चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, पिंपळगाव बसवंत येथील के़के़ वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*