पतीचा संशय दूर करण्यासाठी पत्नीने दिली सत्वपरीक्षा

0
उकळत्या तेलात घातला हात
अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन मुलींच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी काम करणार्‍या एका महिलेच्या चारित्र्यावर पतीने संशय व्यक्त केला. मात्र, मनात कपट नसल्यामुळे पत्नीने उकळत्या तेलात हात घालत पतीस आपल्या चारित्र्याचे प्रमाण दिले. ही घटना नगर शहातील एका सामान्य कुटुंबात घडली आहे. दोघांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांचा संसाराचा गडा पुन्हा सुरळीत सुरू झाला आहे.
सतयुगात महिलांना अग्नीपरिक्षा द्याव्या लागल्या असल्याचे दाखले इतिहासात आहे. मात्र, आजच्या आधूनिक युगात देखील तिच परिस्थिती असल्याचे नगरमधील घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील माळीवाडा परिसरात एक कुटूंब राहत असून पती रिक्षा चालक म्हणून काम करतो. या कुटूंबात सलग तीन मुली झाल्यानंतर वंशाला दिवा म्हणून चौथा मुलगा जन्माला आला.
मुलींचे लग्न करुन देण्यासाठी पैसे नसल्याने या कुटूंबातील पत्नीने धुनी भांडी करुन तिघींचे विवाह लावुन दिले. या लग्न कार्यासाठी मद्यपी पतीकडून मदत झाली नाही. मात्र, न डगमगता पत्नीने जिद्दीने ज्या ठिकाणी कामाला जात होती तेथील प्रत्येक मालकांकडून उसनवार पैसे घेतले होते.
या कुटूंबातील मुलींचे लग्न झाल्याने कल्याण झाले खरे. मात्र आजही ही या महिलेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा उतरलेला नाही. असे असतांना मद्यापी पतीने तिच्या चारीत्र्यावर संशय घेत तिला रोज मारहाण सुरू केली. नवर्‍याच्या संशयाला जागा नको म्हणून त्या महिलेने काम बंद केलेे. मात्र, उचल घेतलेली पैसे कोण फेडणार असा प्रश्‍न तिच्या समोर होता. व्यसनी पतीकडून कर्ज फेडण्यासाठी तिला मदत होत नव्हती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती.
गेल्या आठवडयात तिचा संयम सुटला व ती कामावर गेले. पुन्हा व्यसनी पतीचे पाढे पुन्हा सुरू झाले. या त्रासाला कंटाळून तिने पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मी काहीही चुकीची वागत नाही. मात्र, व्यसनीपती तिचे काही ऐकण्यास तयार नव्हता. पतीची शंका दूर करण्यासाठी तिने चूलीवर तेल उकळण्यासाठी ठेवले. या उकळलेल्या तेलात हात घालुन तिने आपल्या स्वच्छ चारित्र्याचे सिध्दत्व देण्याचा प्रण तिने केला. तेल उकळले असतांना तिन त्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा व्यसनीपतीची दारू उतरली. त्याने पत्नीचा घट्ट धरुन तिला बाजूला खेचला.
उकळत्या तेलाचे ओघळ तिच्या हातावर पडल्याने ती जखमी झाली. त्याच पतीने हात घट्ट पकडल्यामुळे तिच्या हातातील बांगड्याच्या काचेमुळे हाताची धमणी कापली गेली. धमणीच कापली गेल्याने हातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या महिलेस जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने दोघांचे स्नेहाधार येथे प्रिया सोनवणे यांच्याकडून समुपदेशन करण्यात आले. व्यसनी पतीला त्याची चुक समजली असून दोघांची संसार गडा सुखाने सुरू झाला आहे.

महिलांचा अंत पाहू नये
पतीचा पत्नीवर संशय हा महिलांच्या आयुष्याला लागलेला काळींबा आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे. पतीसोबत संसाराचा गाडा हाकायाचा आणि पुरुष पतीने नको त्या पध्दतीने पत्नी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत शिंतोडे उडवाचे हे संस्कृतीला शोभत नाही. संसारात जर पत्नीला चारित्र्याची सत्वपरिक्षा देण्याची वेळ येत असेल तर त्याला संसार कसा म्हणाचे. पुरुषांनी अशा गोष्टीत तरी महिलांचा अंत पाहू नये.
– शिल्पा केदारी (महिला केंद्र समन्वयक)

कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा
पती-पत्नी वादाची बहुतांश प्रकरणे ही चारित्र्याच्या संशयावरुन असतात. मात्र, समुपदेशनाने त्यावर योग्य मार्ग निघतो. यामुळे महिलांनी कधीही टोकाची भूमीका घेण्याची गरज नाही. स्वत:ला इजा होईल असे कृत्य करु नये. रागावर नियंत्रण करत संयमाने प्रश्‍न सोडवावे. महिलांनी तक्रार निवारण किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. स्वत: अग्नीपरिक्षा देण्यापेक्षा कायदेशीर मार्गाची लढाई अवलंबवावी.
– जयश्री काळे (पोलीस उपनिरीक्षक)

LEAVE A REPLY

*