उसावर पांढर्‍या माशीचा हल्ला

0

प्रवरा परिसरातील शेतकरी हवालदिल

लोणी (वार्ताहर) – प्रवरा परिसरात उसाच्या शाश्‍वत पिकावर मोठे संकट आले असून पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने हिरवीगार उसाची पिके अचानक पिवळी पडून पाने वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच दररोजच्या पावसाने फवारणी घेणे शक्य होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी जून महिनाअखेरपर्यंत पाटपाण्याचे आवर्तन सुरु राहिल्याने प्रवरा परिसरात उसाची पिके जोमदार आहेत. सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा उसाच्या लागवडीकडे वळल्यानंतर रोगांचा सामना करावा लागत आहे. प्रवरा परिसरात यावर्षी सुरु उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शेतकर्‍यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व मशागती पूर्ण केल्यानंतर आता पिकाची शाश्‍वती येत असतानाच पांढर्‍या माशीने उसाच्या पिकावर हल्ला चढवला आहे.
अचानक उसाचा रंग बदलू लागल्याने शेतकर्‍यांनी तजज्ञांची भेट घेऊन माहिती घेतली असता या रोगाचा खुलासा झाला. पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे कृषी अधिकारी श्री. एलम यांनी काही शेतकार्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर दोन प्रकारचे रोग आढळून आले. त्यात पांढर्‍या माशी बरोबरच पांढरा लोकरी मावा मोठ्या प्रमाणात दिसून आला. लोकरी मावा शेतकर्‍यांना नवीन नाही पण पांढरी माशी नवीन आहे. विशेष म्हणजे तिच्याकडूनच मोठे नुकसान होत आहे. कारण ती वेगाने वाढत आहे. श्री. एलम म्हणाले कीडग्रत शेतात पिवळा रंग दिलेले कार्ड बोर्ड सापळे (ग्रीस लावून) वार्‍याच्या दिशेने उभे केल्यास मादी आकर्षित होऊन चिकटते.
प्राईड अ‍ॅसित्यामी प्रीड 20 टक्के एस.पी. 40 ग्रँम 200 लिटर पाण्यात एकरी फवारावे. हीच औषधे ठिबकमधून देता येतात. पण त्याचे प्रमाण वेगळे घ्यावे लागते. पावसाळ्यात जैविक कीटकनाशके अधिक परिणामकारक ठरतात. त्यासाठी मेट्यारीझिएम एक लिटर आणि व्हर्टिसिलिअंम जेक्यांनी एक लिटर हे 200 लिटर पाण्यात प्रति एकर फवारावे.
प्रत्येक फवारणीच्यावेळी सेवर हे स्टिकर वापरावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असला तरी पावसाची दररोजची हजेरी अडचणीची ठरत आहे. उसाच्या शेतातील पाणीच कमी होत नसल्याने फवारणी घेणे शक्य होत नाही. पाऊस उघडला तरी एक आठवडा फवारणी शक्य होणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

प्रादुर्भाव जास्त असल्यास हेक्टरी 110 ते 120 किलो युरिया दरमहा दिल्यास पीक सुधारते. खोडवा पिकास पाण्याचा ताण पडून देऊ नये. क्रायसोपरला कारणी या भक्षकांची 2500 अंडी किंवा अळ्या प्रति हेक्टरी सोडाव्यात. टाटा मिडा इमिडायक्लोप्रिड 17.8 एस. एल. 200मिली हे 200 लिटर पाण्यात एकरी फवारावे. मियोथ्रीन फेंप्रोप्याथ्रीन 30 टक्के इ.सी. 200 मिली 200 लिटर पाण्यात एकरी फवारावे.

 

LEAVE A REPLY

*