महापौरांकडून पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

0
पंचवटी | दि. २४ प्रतिनिधी – म्हसरूळ परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी आज दुपारी दिंडोरी रोडवरील पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करीत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच शहरवासीयांची पुढील दहा वर्षांची तहान लक्षात घेता येत्या काही दिवसात अमृत योजनेंतर्गत शहरात ३८ नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले.

म्हसरूळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांना जलशुद्धीकरण केंद्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसून आले. गढूळ पाण्याचा पुरवठा जलवाहिनी फुटल्याने सुरू असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे कामदेखील त्वरित हाती घेण्यात आल्याची माहिती भानसी यांनी दिली. तसेच जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने महासभेत निर्णय घेऊन संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याच्या निविदा काढण्याचे आदेश यावेळी अधिकार्‍यांना दिले. या ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्यासाठी येतात.

त्यासाठी असलेला रस्ता फारच लहान असल्याने बाजूलाच असलेल्या विद्युत वितरणाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांच्या जागेतून मोठा रस्ता करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात पुढील दहा वर्षांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ३८ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. यातील ६ जलकुंभ पंचवटीतील म्हसरूळ, तलाठी कॉलनी, मखमलाबाद, कोणार्कनगर, आडगाव आणि चौधरी मळा परिसरात उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.

जुने झालेल्या जलकुंभांची नव्याने निर्मिती करून त्या ठिकाणी जास्त क्षमतेच्या जलकुंभाची निर्मिती करण्यात येईल. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येऊन लवकरच कामे सुरू करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक अरुण पवार, अधीक्षक अभियंता एस.एम.चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, अविनाश धनाईत, उपअभियंता आर.एम. शिंदे, डी.एम. बागुल, जी.के.गोरडे, ए.ए.खान आदींसह अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*