जलसंधारणामुळे १४०० हेक्टर ओलिताखाली!

जि.प. लघुपाटबंधारेच्या पश्‍चिमकडून २१६ कामे मार्गी

0
नाशिक | दि. १६ सोमनाथ ताकवाले- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पश्‍चिम विभागाने बागलाण, दिंडोरी, देवळा, कळवण, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये जलसंधारणाची सुमारे २१६ कामे केल्याने या भागात सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास हातभार लागला आहे.

पाणी आडवा, पाणी जिरवा याबरोबरच अस्तित्वात असलेल्या गावतळे, ग्रामबंधारे, सिमेंट कॉंक्रिट बंधारे आदींची नवी कामे आणि दुरुस्ती कामे करताना गाळ उपसा, खोली रुंदीकरण करणे आणि वाहून जाणारे पाणी आडवणे आदींचे ३०२ नवीन आणि ४० दुरुस्ती कामे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पश्‍चिम विभागाने हाती घेतली होती. यातील सुमारे १८५ कामे पूर्ण केली आहेत.

तर दुरुस्तीची सुमारे ३१ कामे मार्गी लागली आहेत. नवीन कामे आणि जुनी कामे मिळून सुमारे २१६ जलसंधारणाची कामे गत आर्थिक वर्षात पूर्णझाल्याने यातून सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षरीत्या ओलिताखाली आले आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बर्‍याच अंशी कमी झाल्याची माहिती ल. पा. पूर्वचे अधिकारी सी.डी. वाघमारे यांनी दिली.
गेल्यावर्षी दुष्काळामुळे जिल्ह्यात सुमारे २४० टँकर दिवसाला सुमारे ७०० फेर्‍या करून टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करीत होते. त्याचबरोबर शिल्लक जलसाठ्याचे आरक्षण केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच होते. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्याचा जलसाठा केवळ ८ टक्के उरला होता, तर अनेक धरणांत मृत जलसाठा उरला होता. त्यामुळे यंदा जलयुक्तची कामे तात्काळ करावीत यासाठी शासनाने जिल्हा परिषदेला कामांचे लक्ष्य दिले होते.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणासाठी जलयुक्त शिवाराला महत्त्वाकांक्षी योजना ठरवून त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली होती. निधीची व्यवस्था नसल्याने या योजनेसाठी शासनाच्या विविध खात्यांचा अखर्चित निधी वापरावा, असे सूचीत करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*