व्यापारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

२५ जून रोजी मतदान; हालचाली गतिमान

0
नाशिकरोड | दि. १९ प्रतिनिधी- संपूर्ण नाशिकरोड व परिसरात चर्चेचा विषय ठरलेल्या व नाशिकरोडची मुख्य अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या नाशिकरोड देवळाली सहकारी व्यापारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून दि. २५ जून रोजी २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकरोड देवळाली सहकारी व्यापारी बँकेची निवडणूक होणार म्हणून चर्चा सुरू होती. ही निवडणुक डिसेंबरमध्ये होती. परंतु मनपा निवडणुकीमुळे ती सहा महिने पुढे ढकलण्यात आली. आता जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. दि. १९ ते २३ मे दरम्यान सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधकांच्या निवडणुक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. याच कार्यालयात उमदवारी यादी रोज सायंकाळी ४ वाजता प्रसिध्द केली जाईल. दि. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता छाननीला प्रारंभ होईल.

\दि. २५ मे रोजी विधीग्राह्य उमेदवारी पत्रांची यादी जाहीर केली जाईल. दि. २६ मे ते ९ जून या कालावधीत सकाळी ११ ते ३ दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. दि. १२ जूनला निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम यादीचे प्रकाशन होईल. दि. २५ जून रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होईल. दि. २६ जूनला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. मतदान व मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर केले जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

हालचाली गतिमान
व्यापारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सुमारे ६५ हजार सभासद असलेल्या व अंदाजे एक हजार कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या बँकेच्या या निवडणुकीत सुमारे ६१ हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांना २२ पैकी १६ जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी पॅनलचे मोहनलाल चोपडा, हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, सुनिल आडके यांच्या श्री व्यापारी पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. सध्या सत्तारूढ सहकार पॅनलमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान संचालकांसह इतर इच्छुकांनी गायकवाड व अरिंगळे यांना भेटून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गायकवाड व अरिंगळे यांच्या पॅनलमध्ये काही विद्यमान संचालकांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी विरोधी पॅनलशी बोलणी सुरू केली असल्याचे समजते.
विद्यमान संचालकांत काहीजण निवडणुक लढविण्याचा मनस्थितीत नसल्याचे समजते. त्यांच्याऐवजी त्यांच्या नातेवाईकांची पॅनलमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. निवडणूक लढविण्यासाठी नव्याने नगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, अनिता करंजकर, चंद्रकांत विसपुते, योगेश नागरे, शाम गोहाड, विक्रम कोठुळे, मुन्ना अन्सारी, सुदाम ताजनपुरे, शंकर धनवटे, दिनकर पाळदे, रमेश गायकर, अरूण जाधव, तानाजी भोर, हनुमंता देवकर, राजाभाऊ चौधरी, राजन बच्चुमल, प्रकाश गोहाड, प्रकाश घुगे, जयश्री गायकवाड, शिवाजी भोर, कन्हैय्या आलठक्कर, ऍड. मुकुंद आढाव, बाबुराव आढाव आदी इच्छुक असल्याचे समजते.
या निवडणुकीत वरील दोन पॅनलमध्ये ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते तिसरा पॅनल काढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून या चार दिवसांत किती उमेदवारी अर्ज दाखल होतात त्यावरून खरा अंदाज येणार आहे. त्यानंतर ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीचा कालावधी असल्याने त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात कितीजण राहतात हे स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*