नगरशी नाते जुनेच : विश्‍वजीत माने

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्हा राज्यातील प्रगत जिल्ह्यापैकी एक आहे. हा माझ्या जन्माचा जिल्ह्यात झालेला नसला तरी याच जिल्ह्यात माझे शिक्षण झालेले आहे. यामुळे ठिकाणी काम करण्यास मी उत्सूक असून नगरशी माझे नाते जुनेच असल्याचे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी ‘सार्वमती’शी बोलतांना स्पष्ट केले.

महिनाभरापूर्वी माने यांची नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली होती. बदलीनंतर माने पुण्याला एक महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण पूर्ण करून माने बुधवारी दुपारी नगरला हजर झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्याकडील मुख्य कार्यकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माने यांनी स्वत:कडे स्वीकारला. त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक घेत विभागनिहाय विषय आणि योजना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माने पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले वडिल महात्मा फुले कृषी विद्यापीठा नोकरीस होते. त्यामुळे 5 वी ते 10 वीपर्यंतचे त्यांचे शिक्षण विद्यापीठाच्या आवारात असणार्‍या माध्यमिक शाळेत झालेले आहे. यासह कॉलेजचा काही काळ या ठिकाणी गेलेला असल्याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात त्यांचा मित्र परिवार आहे.

1988 ला उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर माने यांनी विदर्भात 4 वर्षे काम केले. मेळघाट या ठिकाणी कामाचा अनुभव असून त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र, मुंबई, पुन्हा पश्‍चित महाराष्ट्रात काम त्यांनी सेवा केलेली आहे. नाशिक विभागात पहिल्यांदा नगर जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाल असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्हा राज्यात आकाराने मोठा आहे. त्यात महसूलसह अन्य शासकीय यंत्रणेत आतापर्यंत काम केलेले असले तरी जिल्हा परिषदेत काम करण्याचा हा अनुभाव पहिला आहे. यामुळे सुरूवातीच्या काळात जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग आणि त्यांच्या योजना समजून घेतल्यानंतर विकासात्मक योजनांना बळ देत त्या कशा पुढे नेता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महसूल विभागात अधिकारीशाही असते. त्या ठिकाणी निर्णय घेवून त्याची लगेच अंमलबजावणी करता येते. मात्र, जिल्हा परिषद विकासात्मक संस्था आहे. या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह सदस्य हे लोकप्रतिनिधीनी असतात. या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारी यांना सोबत घेवून काम करावे लागते. अधिकारी आणि पदाधिकारी हे विकास रथाचे दोन चाके असल्याने दोघांना समजावून घेत नियमानूसार काम करणार असल्याचे माने यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत काम करण्याचा पहिला अनुभव असल्याचे माने यांनी  सांगितले. आता ते विभागनिहाय योजना आणि विषय समजून घेणार आहे. राजकीय, सामाजिक, भौगोलिक विविधतेने नटलेल्या नगर जिल्ह्यात अधिकार्‍यांना काम करणे तसेच अवघडच आहे. यामुळे जिल्हा परिषदेत काम करतांना माने यांची कसोटीपणाला लागणार आहे. 

LEAVE A REPLY

*