दिडशे वाहन परवाने जप्त; वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार्‍यांवर कारवाई

0
नाशिक : वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार्‍यांविरोधात शहर वाहतूक विभागासह प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत एप्रिल महिन्यापासून तब्बल 156 वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. यातील 46 परवाने निलंबित झाले असून उर्वरित वाहन परवान्यांबाबत निर्णय प्रलंबित आहेत.

प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी विविध उपयोजना सुरू केल्या आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत अपघात करून पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाते. संबंधित वाहनचालकाचा थेट वाहन परवानाच जप्त केला जातो. तसेच समाधानकारक स्पष्टीकरण दिले गेले नाही तर हा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो.

वाहन परवाना निलंबित करण्याचा अधिकार एआरटीओ दर्जाच्या अधिकार्‍यांना असतो. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तब्बल 156 वाहन परवाने जप्त करून आरटीओकडे पाठवण्यात आले आहेत. यातील 46 परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून उर्वरित वाहन परवान्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

जप्त वाहन परवान्यांबाबत दर बुधवारी आणि शुक्रवारी आरटीओ कार्यालयात दुपारी 3 ते 5 या वेळेत सुनावणी होती. ज्या वाहनचालकांचा परवाना जप्त केला जातो त्याने या काळात सुनावणीला हजर राहून आपली बाजू मांडणे अपेक्षित आहे.

वाहनचालकाला समाधानकारक खुलासा करता आला नाही तर निलंबनाची कारवाई होते. निलंबनाच्या कारवाईनंतर संबंधित वाहनचालकाने पुन्हा असा गुन्हा केला तर त्याचा परवानादेखील रद्द होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांविरोधात पोलिसांना सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत.

या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यात बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना टारगेट करण्यात येत आहे. त्यांच्यावरही कडक कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*