ऐन पावसाळ्यात भाजीपाला तेजीत

0

नाशिक (सोमनाथ ताकवाले) | जुलै-ऑगस्ट महिन्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर घरसलेले असतात, हे चित्र दरवर्षी नित्याचे असते. मात्र, यंदा याला फाटा मिळाला आहे. ऑगस्ट महिना निम्मा उलटला तरी पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर ग्राहकांच्या आवाक्यात आलेले नाहीत.

मेथीचे दर सुमारे 60 रुपये तर कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर सुमारे 180 रुपयांपर्यत पोहोचल्याचे चित्र जुलै महिन्यात मार्केटयार्डात लिलावात होते. हा उच्चांकी भाव यंदा मिळाला. मात्र त्याचबरोबर कारले, दोडके, गिलके, वांगे, भेंडी, टोमॅटो, ढोबळी, काकडी या फळभाज्यांचे दरही 60 ते 120 रुपये प्रतिकिलो झाल्याचे याच पावसाळ्यात चित्र होते. अजूनही दरात मोठी घसरण झालेली नाही. उलट शेतमालाची आवक वाढलेली असताना भावही वाढलेले आहे. त्यामूळे शेतकरीवर्ग सध्या समाधान व्यक्त करीत आहे.

पालेभाज्या आणि फळभाज्यांची मागणी परपेठेसह, स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर परराज्यात पावसामुळे शेतमालाचे नुकसान अधिक झाल्याने भाजीबाजारात शेतमालाची आवक घटलेली आहे. नाशिकच्या बाजारपेठेतूनच पालेभाज्या आणि फळभाज्यांची रवानगी परपेठेत होत असल्याने नाशिकमध्ये मुबलक होणारी आवक त्यामूळेच अधिक दराने खपली जात आहे.

पावसाळाच्या आरंभी लागवड झालेल्या पालेभाज्या आणि फळभाज्या एरवी जुलै-ऑगस्टमध्ये विक्रीयोग्य परिपक्व होतात. त्यामूळे बाजारपेठेत त्याची आवक वाढून ते विक्रीसाठी येत असतात त्यामूळे आपोआपच भाजीपाल्याचे दर घसरतात. मात्र, आता तसे चित्र नाही उलट शेतमालाचे दर वाढले आहेत, असे बाजार समितीच्या दरनोंदीवरूनही लक्षात येत आहे.

टोमॅटोला तेजीचा लाली : बाजार आवारात सध्या चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची आवक जिल्ह्यातून वाढलेली आहे. तरी 20 किलोचे कॅरेट सुमारे 700 ते 900 रुपये दराने विक्री होत आहे. गेल्या महिन्यात तर टोमॅटो 120 रुपये किलो दराने बाजार समितीत विक्री झाला होता. त्यानंतर सरासरी दर 750 ते 800 रुपये असा दर 20 किलोच्या जाळीला उपलब्ध होत होता. डाग असलेले टोमॅटोही सध्या लिलावात भाव खावून जात आहे त्यामूळे टोमॅटो उत्पादकांना चांगला दर मिळाला आहे. हाच टोमॅटो एप्रिल-मे महिन्यात अवघा 50 ते 60 पैसे किलो दराने विक्री झाल्याचे चित्रही होते. त्यामूळे शेतकर्‍यांनी टोमॅटो रोपे शेतातच तोडून टाकल्याची वस्तुस्थिती होती.

कांद्याने डोळ्यात पाणी : कांद्याचे दर गत 25 दिवसात चांगलेच वधारले आहे. जो कांदा 500-600 रुपये क्विंटल दराने मोठ्या मुस्कीलने विक्री होत होता. तोच कांदा आता सरासरी 2000 रुपये दराने विक्री होत आहे. कांद्याची ही दरवाढ सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे कारण, किरकोळ बाजारात कांदा 25 ते 30 रुपये किलो दराने भाजीविक्रेत्यांकडून केला जात आहे. नाशिकच्या 12 बाजार समित्यात कांद्याची आवक दिवसाला 1 लाख क्विंटल होत आहे. हा कांदा मोठ्या प्रमाणात असताना बाजारात कांद्याचे दर तेजीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

कोथिंबिर तेजीतच : कांदा, टोमॅटो दर तेजीत असताना कोथिंबिरीचे दर ग्राहकांच्या आवाक्यात अजून आलेले नाही. उत्तम प्रतिच्या कोथिंबिरीचे दर सध्या 20 ते 60 रुपये जुडी आहेत. त्याचबरोबर गावठी कोथिंबिरीला परपेठेतून अधिक मागणी असल्याने या कोथिंबिरीचे दर छाणी कोथिंबिरीच्या दरापेक्षा दुप्पट आहे.ज्या शेतकर्‍यांनी गावठी कोथिंबिरीचे पीक घेतले, त्यांना चांगल्या दराची लॉटरी यंदाच्या हंगामात लागली.

LEAVE A REPLY

*