वरघोडा मिरवणुकीने अष्टमहासिद्धी तपाची पूर्णाहूती

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – चार्तुमास पर्वानिमित्त कापड बाजारातील मंदिरात 14 जुलै ते 29 जुलै या कालावधीत अष्टमहासिद्धी तप हा  पवित्र असा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाला. या 16 दिवसांच्या अष्टमहासिद्धी तपाची पूर्णाहुती शनिवारी सकाळी वरघोडा मिरवणुकीने झाली. यात 150 तपस्वींसह श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली.

चातुर्मासानिमित्त कापडबाजार जैन मंदिरात साध्वीजी प्रखर वक्ता संवेगनिधीश्रीजी आदी ठाणा 7 यांच्या सांनिध्यात चातुर्मासाची आराधना अतिशय उल्हासी वातावरणात होत आहे. अष्टमहासिध्दी तप 16 दिवसांचे असून यात आठ दिवस उपवास व आठ दिवस बियासने करण्यात येतात. नगर शहरात प्रथमच होणार्‍या या तपात 150 तपस्विनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
या तपाच्या सांगतेनिमित्त शनिवारी सकाळी शनिगल्ली येथील अक्षता अपार्टमेंट मधील भारतीबेन अजित गांधी यांच्या निवासस्थानापासून गौतमस्वामींच्या मूर्तीची सजवलेल्या रथातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथकाने सुरेल वादन सादर केले. मिरवणूक प्रारंभी गुजरगल्ली येथील जैन मंदिरात नेण्यात आली. याठिकाणी सामूहिक दर्शन, प्रार्थना झाली. यानंतर चितळे रोड, नवीपेठ, सेंट्रल बँक रोड मार्गे मिरवणूक कापड बाजारातील, जैन मंदिरात दाखल झाली. मिरवणुकीत श्री सिमंधर स्वामी भक्त मंडळ ग्रुपच्या नरेश शहा व त्यांच्या सहकार्‍यांनी दांडिया रासचा कार्यक्रम सादर केला.
जैन मंदिरात अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सर्व तपस्वी व श्रावक श्राविकांचे स्वागत केले. साध्वीजी संवेगनिधीश्रीजी यांनी अष्टमहासिध्दी तपाचे महत्त्व सांगितले. यावेळी जैन मंदिराचे ट्रस्टी लालचंद कासवा, मणिकांत भाटे, दिनेश गांधी, राजू शहा, विनोद शाह, बाळासाहेब भंडारी उपस्थित होते. सर्व तपस्वींचा अजितकुमार अक्षयकुमार गांधी परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंंगी गौतम प्रसादीची व्यवस्था करणारे बाळासाहेब गुगळे व गौतम गुगळे यांचा मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

*