आरोग्य विज्ञान विद्यापीठाला विविध उपक्रमांतून जागतिक दर्जा : वायुनंदन

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात

0
नाशिक | दि. १० प्रतिनिधी- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन वृत्तीला चालना मिळण्यासाठी विविध उपक्रमांतून जागतिक दर्जाचा वेगळा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रयत्न केल्यास हमखास यश आपल्या पदरी पडते. विद्यार्थ्यांनी सेवाभाव जोपासून भविष्यात कार्य करावे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायुनंदन यांनी आज केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १९ वा वर्धापनदिन समारंभ विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर होते. तर व्यासपीठावर प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, प्र. वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्य सतीश डुंबरे, डॉ.विरेंद्र कविश्‍वर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अरुण भस्मे व वैद्य यशवंत पाटील तसेच जीवन गौरव प्राप्त पुरस्कार्थी वैद्य राजपाल शंकरराव पाटील, वैद्या मीरा मधुकर परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात अध्यक्ष कुलगुरु डॉ.म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाने आजवर अथक प्रयत्नाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती केली आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व संशोधनाच्या विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्याचा मानस आहे. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दर्जेदार संशोधनाचे प्रस्ताव विद्यापीठाला पाठवावे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान अधिक विकसित होण्याकरिता निवडक विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित केले जात आहे.

डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल लघुपट तयार करणारा नांदेडचा विद्यार्थी अनिरुध्द पाटील तसेच प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये महिलेची प्रसूति करणार्‍या नागपूरचा विपीन खडसे यांचा विशेष सन्मान केला गेला असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.  प्रास्ताविकात विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर म्हणाले, विद्यापीठातर्फे अनेक विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहे.

परीक्षा निकाल कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करुन प्रात्यक्षिक परीक्षा, विद्यार्थी शैक्षणिक कक्ष, स्टुडंट हेल्पलाईन सर्विस,परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही,ऑनलाईन शिक्षक मान्यता प्रणाली आदी सुविधा कार्यन्वित करण्यात आल्या आहेत.प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांना विविध पुरस्कार देण्यात येतात. यामुळे महाविद्यालयांतील इतर शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. सोहळ्याचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. शेवटी आभार प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी मानले.

या समारंभामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या वैद्यकीय, दंतआयुर्वेद व युनानी, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेच्या ४२ विद्यार्थ्यांना सुवण पर्दके प्रदान करण्यात आली. तसेच सन २०१६-१७ करीता डॉ. शरदीनी डहाणूकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व वैद्यकीय विद्याशाखेसाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार अहमदनगरचे डॉ. विठ्ठलराव विखेपाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. सुनील नाथा म्हस्के यांना प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी पुरस्कार कोल्हापूर येथील जे. पी. ई. एस.चे होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वप्नील सुरेश व्यवहारे याला प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष मोलाचे कार्य केल्याबद्दल पुरस्कार नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिरुध्द पाटील व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विपीन खडसे यांना प्रदान करण्यात आला.

तसेच सन २०१६-१७ साठी उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ. सारिका चोपडे यांना व राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट एकक पुरस्कार पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. सदानंद देशमुख यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट स्वयंसेविक पुरस्कार मुलांमध्ये नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रवींद्र आर. यादव यांना व मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्षंदा इनामदार यांना प्रदान करण्यात आला.

प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाकरिता राष्ट्रीय सेवा योजनेमधून सहभागी झाल्याबद्दल पुरस्कार आशिकी घाडगे (मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय नशिक) यांना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या नाशिक येथील ए.एस.एस. आयुर्वेद महाविद्यालयातील ऐश्‍वर्या नागरे यांना, द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल अहमदनगर येथील वाय. सी. एम. दंत महाविद्यालयातील मृणाली अशोकराव शिरसाठ तर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल पुणे येथील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील कु. तेजस्वीनी नरेंद्र चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

*