रेशन दुकानदारांना अल्टिमेटम; संप मागे न घेतल्यास रद्दची कारवाई

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
राज्य सरकार विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेशन दुकानदारांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र हा संप बेकायदेशीर असून दुकाने बंद ठेवणार्‍या दुकानदारांना प्रशासनाने तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

तरीही संप मागे न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात रेशन दुकानदारांशी चर्चा सुरू असून काही दुकानदारांनी संप मागे घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि रेशन दुकानदारांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. हा संप होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांच्या तब्बल पाचवेळा बैठका घेत संप मागे घेण्याचे आवाहन दुकानदारांना केले.

परंतु दुकानदार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने ही बैठक निष्फळ ठरली. संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी केला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ या संघटनेने या संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहर, नाशिक एफडीओ, मालेगाव तालुका, मालेगाव एफडीओ, सिन्नर, येवला या तालुक्यांमधील एकही रेशन दुकानदार या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.

मात्र जे दुकानदार संपात सहभागी झाले आहेत त्यांच्याशी संप मागे घेण्याबाबत चर्चा सुरू असून यातील काही दुकानदारांनी येत्या दोन-तीन दिवसात संप मागे घेण्याची तयारी दर्शवल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. साधारणपणे दर महिन्याच्या 4 तारखेपर्यंत चलने भरली जातात. त्यामुळे या दुकानदारांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. मात्र यानंतरही संप मागे न घेतल्यास दुकानदारांवर दुकाने रद्दची कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*