देवळ्यात गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात; तीन जनावरे ठार; दोघे ताब्यात

0
देवळा | अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीला देवळा मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी जवळील करला नाला येथे अपघात झाला. या अपघातात तीन जनावरांचा मृत्यू झाला तर बॅटरी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडी जळून गाडीचे नुकसान झाले.

याप्रकरणी देवळा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन जण फरार झाले तर अकरा जनावरांसह गाडी असे २ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काल शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास टाटा ९०९ कंपनीची गाडी क्रमांक (एम एच ४८ जे ३६२७) मधून अवैधरीत्या अकरा जनावरांना पाय बांधून मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. यावेळी खुंटेवाडी जवळील करला नाल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला  पलटी होऊन गाडीत कोंबून भरलेल्या अकरा जनावरांपैकी तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला.

गाडीच्या बॅटरी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने अचानक पेट घेतला यावेळी शेजारील नागरिकांनी वेळीच धाव घेऊन जनावरे बाहेर काढल्याने जीवितहानी टाळली. नागरिकांनी देवळा पोलीस ठाण्यात कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल करून पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पंडित सोनवणे यांच्या तक्रारीवरून इम्तियाज अहमद जावेद अहमद वय २३, रा. चांदनपुरी, अली अहमद महंमद शाबीर, वय २७, रा. नुमानी नगर, मालेगाव, अशपाक अहमद अब्दुल करीम, रा. नजमाबाद व शेख आसिफ शेख नूर रा. मदानेनगर, मालेगाव यांच्यावर अवैध गोवंशाची अमानुष पाने वाहतुक करणे, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन घटनास्थळावरून दोन संशयितांना अटक केली.

तर इतर दोघे अंधाराचा  फायदा घेऊन फरार झाले. सदर घटनेचा पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ साबळे, निलेश सावकार, मल्ले, हेमाडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*