पर्यटकांना खुणावतेय देवळीकराडचे हेमाडपंथी शिव-पार्वती मंदिर

0

अभोणा (देवेंद्र ढुमसे) | अतिप्राचीन मंदिरे काही प्रमाणत कळवण तालुक्यातही आढळतात. हेमाडपंथी शिवमंदिर देवळीकराड व मार्केंड पिंप्री येथे आहेत.

सुमारे सातशे वर्षापूर्वी  बांधलेली मंदिरे आजही भक्कम स्थितीत आहेत. तालुक्याच्या पश्चिमेला आदिवासी बहुल भागात असलेले शिवमंदिर स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. देवळीकराड मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात महादेवाच्या पिंडासह भिंतीवर कोरलेली शिव-पार्वतीची पुरातन मूर्ती याठिकाणी पहावयास मिळते.

याठिकाणी पोहोचण्यासाठी कळवण गावापासून चणकापूरच्या पुढे उजव्या रस्त्याने जावे लागते. तीनशे ते चारशे लोकवस्तीचे आदिवासी गाव असलेल्या देवळीकराड येथे राजा रामदेवराय यांचे काळात हे हेमाडपंथी शिवमंदिर उभारण्यात आले आहे.

अतिशय विलोभनीय असलेले हे मंदिर बघताच क्षणी नजरेत भरते, गिरणा नदीच्या काठावर डोंगर दर्याच्या कोंदणात असलेले हे मंदिर शिल्पकलेचा आविष्कारच म्हणावा लागेल. जेथे-जेथे शिवमंदिरे आहेत तेथील मंदिरे रामेश्वर, त्रंबकेश्वर म्हणजेच श्वर ह्या नावाने जोडले जातात मात्र हे मंदिर फक्त शिवमंदिर म्हणून परिचित आहे हे विशेष.

पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिराचे बांधकाम चुना, सिमेंटचा वापर न करता करण्यात आले आहे. वेगवेगळ्या आकाराचे दगड एकमेकावर रचून त्यांना घडवून आकार देण्यात आला आहे.

मंदिर हे पूर्ण कळसासहित शाबूत असून आतून व बाहेरून केलेली कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडते. नागर पद्धतीचा कळस शिखराचे वेगवेगळे थर लक्षवेधी असेच आहेत. मंदिर प्रथमता पाहणार्याला मंदिर आतून आधी पाहवे त्याबहेरची  कलाकुसर आधी पहावी असे प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनात येतात.

मंदिराचा पायथा उंच असून मंदिराच्या अर्धमंडपात कोरीव असे खांब आहेत. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कीर्तिमुख आणि द्वारपालनाच्या मूर्ती आहेत. पुढे सभामंडपात अस्थकोणी खांबावरून घुमटाकार होत गेलेले छत आहे.

मंदिराच्या गर्भगृहात म्हणजेच गाभार्यात खोलगट ठिकाणी अतिशय सुनाद्र असे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला असलेलें तीनशे वर्षापूर्वीचा डेरेदार पिंपळ वृक्ष शीतलता निर्माण करतो. येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.

प्राचीन व हेमाडपंथी असलेल्या ह्या शिवमंदिराला भेट देऊन दर्शन घेतल्यास मनशांती मिळते. निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर अतिशय अजोड असून दुर्लक्षित आहे.

मंदिराची काळजी न घेतल्याने मंदिराच्या दगडावर गवत उगवेलेल दिसते. कोरीव काम केलेले पाषाण खराब होत आहे. मंदिराकडे जाणर्या मुख्य रस्त्याची व देवळीकराड गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

तसेच पुरात्व विभागाने मंदिराची पाहणी करून जीर्ण होत चाललेल्या मंदिराची आधुनिक पद्धतीने कोटिंग करावे अशी मागणी भाविकांकडून केली जाते आहे.

मंदिर व मंदिराकडे जाणारा रस्ता व परिसर अतिशय निसर्गरम्य असून जंगल, डोंगर, आदिवासी लोकवस्ती जवळच असलेले चणकापूर धरण, काही किमी वर असलेले थंड हवेचे ठिकाण सापुतारा, हतगडचा किल्ला असा सारा माहोल असल्याने ह्या भागाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*