तीन लाखांचा मद्यसाठा जप्त; गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई

0
नाशिक । शरणपूररोडवर होंडासिटी कारवर छापा मारून सुमारे तीन लाख रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने शनिवारी सायंकाळी केली. या घटनेतील होंडासिटी कार जप्त करण्यात आली असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

रामदास रामचंद्र सहाणे (44, रा. शिंदे गाव, राज रेसिडेन्सी हॉटेलच्या मागे, शिवाजीनगर, ता. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. विनापरवाना मद्याची वाहतूक शहरात होणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे युनिट-1 चे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली होती.

याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली असता गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते, युनिट-1 चे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, नागेश मोहिते, सचिन खैरनार, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, चंद्रकांत पळशीकर, हवालदार बाळासाहेब दोंद, संजय मुळक, पोपट कारवाळ, दिलीप मोंढे, संतोष कोरडे यांच्या पथकाने शरणपूररोड परिसरात सापळा रचला होता.

शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एक होंडासिटी कार (एमएच 15 बीएम 1000) शरणपूररोडवरील कुलकर्णी गार्डनकडून श्रद्धा हॉस्पिटल या कॉलनी रोडने जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सदरच्या कारला रोखून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना 24 हजार 300 रुपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.

संशयित रामदास सहाणे यास अटक करण्यात आली असून होंडासिटी कार व विदेशी मद्य असा 3 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*