भुकंपाच्या धक्क्याची नोंदच नाही; प्रशासन बुचकळयात; गुढ कायम

0
नाशिक । कळवण तालुक्यातील दळवटसह पाच ते सहा गावांना रविवारी सकाळच सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असले तरी भुकंपाच्या नोंदी ठेवणारया ‘मेरी’च्या भुकंप मापक यंत्रावर मात्र गेल्या 48 तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.

‘सुपर सोनीक’ विमानांच्या चाचणीदरम्यान होणार्‍या आवाजाने सदरचे धक्के जाणवल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सदरच्या घटनेनंतर तहसिलदार कैलास चावडे यांनी तातडीने संबंधित गावांना भेटी देवून जनतेचे प्रबोाधन केले आहे.

कळवण तालुक्यातील दळवट या भुकंपप्रवण क्षेत्रातील जिरवाडा, चिचपाडा, अभोणा, कनाशी, करंभेळ, जामले, बोरगाव, खिराड, वेरूळे, जिरवाडा, बापखेडा, देसगाव, जामले, बोरदैवत, देवळीवणी, अंबिका, ओझर परिसरात सातत्याने भुकंपाचे धक्के जाणवत असतात.

रविवारी अशाचप्रकारचे धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीपोटी ग्रामस्थ रात्र अक्षरशः जागून काढत आहेत. मात्र या धक्क्यांबाबत कोणतीही नोंद मेरीच्या केंद्रात झाली नसल्याने या आवाजाचे गुढ वाढले आहे. प्रशासनाला याचे कारण सापडले नसले तरी नागरीकांनी घाबरून जाउ नये अशी तात्पुरती मलमपटटी करण्यात आली आहे.

कळवण तालुक्यात सातत्याने जमीनीला बसणार्‍या हादर्‍यांबाबत यापुर्वी ‘मेरी’ या संशोधन संस्थेच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून पाहणी केली आहे, परंतु अंतीम निष्कर्ष कधीच निघाला नाही, तथापि, भुकंपाचे धक्के साधारणत: पावसाळा संपल्यानंतर दिवाळी सणाच्या आसपास बसत असल्याचे आजवरच्या घटनांमधून लक्षात आले आहे.

त्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत मुरून भुगर्भागील हालचालींमुळे अंतर्गत पोकळी निर्माण होऊन धक्के जाणवत असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असता, दिल्ली व कोलकत्ता येथील भुगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी देवून पाहणी केली होती, परंतु त्यातूनही फारसे काही होऊ शकले नाही.

नागरिकांना अलिकडे जाणवलेले धक्के हे कदाचित ‘सुपर सोनीक बुम’ म्हणजेच आकाशात झेपावणारया मोठ्या विमानांंच्या अवाजाने झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*