युवतीची हत्या करुन मृतदेह जाळला

एकलहरे रोडवरील जेलरोड परिसरात घबराट; खुनाचे सत्र सुरूच

0
नाशिकरोड | दि. ३० प्रतिनिधी- येथील एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या भिंतीलगत काल सकाळी एका २१ वर्षीय युवतीचा खून करून तिला जाळून टाकण्याचा प्रकार घडला असून सदरचा प्रकार हा मारेकर्‍यांनी मध्यरात्री केला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली असून गेल्या आठ दिवसात नाशिकरोड परिसरात हा तिसरा खून असून त्यामुळे गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या भिंतीलवगत अंगावर वार केलेल्या जळालेल्या अवस्थेत एका युवतीचा मृतदेह मोकळ्या जागी असल्याची माहिती पोलिसांना समजली. सदरची घटना समजताच पोलीस उपायुक्त कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वपोनि पंढरीनाथ ढोकणे, नारायण न्याहळदे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

मृतदेह संपूर्ण जळालेला असल्याने ओळख पटणे पोलिसांना सुरुवातीला अवघड झाले. त्यामुळे खून करण्यात आलेली महिला ही कोण आहे, तिला का मारले याबाबत पोलिसांना तपास करणे अवघड झाले. मात्र तपासानंतर सदरची महिला ही दिंडोरी रोडवर राहणारी असल्याचे समजते. या युवतीचे नाव हर्षदा आहिरे (२१) असे असल्याचे तपासाअंती समजले.
युवती घरी न परतल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी गंगापूर रोड पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली होती. परंतु पोलिसांनी मिसिंगनंतर दाखल करण्यात येऊन तिची संपूर्ण माहिती घेतली होती.

त्यामुळे सदरची युवती बेपत्ता असल्याने व तिचे नाव हर्षदा आहिरे असल्याचे समजले. मध्यरात्रीच्या सुमारास या युवतीला कोणीतरी अज्ञात मारेकर्‍यांनी अज्ञात स्थळी नेऊन तिच्या अंगावर वार करून नंतर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकले व तिचा मृतदेह एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या भिंतीलगत गवळीबाबा मंदिरासमोर टाकून दिला.
सदरची घटना समजल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्याचप्रमाणे पोलिसांचा ताफा येऊन त्यांनी पंचनामा केला. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्‍वान पथकाने तपासणी केली व काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. या युवतीला कोणीतरी फूस लावून आणले असावे व त्यानंतर तिचा छळ करून व तिच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिला जाळून टाकले.

त्यामुळे हल्लेखोराचे आणि मृत युवतीचे काहीतरी जुने भांडण असावे, असाही संशय व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला नाशिकरोड पोलिसांनी या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु तिचा खून करून जाळून टाकून असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बिजली व त्यांचे सहकारी करत आहे.

पोलीस यंत्रणा हादरली….
गेल्या आठ दिवसांत नाशिकरोड परिसरात खून झाल्याची ही तिसरी घटना असून या खुनाच्या घटनेने पोलीस यंत्रणा पूर्णपणे हादरून गेली आहे. जेलरोड परिसरातील कैलासजी सोसायटीच्या एका बंद फ्लॅटमध्ये एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक केली.

या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच जेलरोड परिसरात असलेल्या मंगलमुर्ती नगर परिसरात कसारा येथून पाहुणा म्हणून आलेल्या तुषार साबळे या १६ वर्षाच्या युवकाचा २० ते २५ जणांच्या टोळक्याने सिनेस्टाईल पाठलाग करून भरदिवसा धारधार शस्त्राने हत्या केली. या दोन्ही घटनेने नाशिकरोड परिसर हादरलेला असतानाच काल सकाळी खून झाल्याची तिसरी घटना घडली.

एकलहरे रोडवर असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या भिंतीलगत गवळीबाबा मंदिरालगत एका २१ वर्षीय युवतीचा खून करून जाळून टाकण्याचा प्रकार करण्यात आला. या तिन्ही खुनांमुळे नाशिकरोड परिसरातील नागरिकांत घबराट झाली असून आठवडाभरात तीन खून झाल्याने गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिसांनी आता गुन्हेगारांचे कंबरडे मोडून त्यांना आपला खाक्या दाखविण्याची गरज असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*