‘मेक इन नाशिक’चा उद्देश सफल – निमा अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी

0
मुंबई : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न  करण्याचे जे वचन दिले तीच मेक इन नाशिकची मोठी फलश्रृती असून आता केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने योग्य प्रस्ताव करण्याच्या कामात आता नाशिककरांनी मनोभावे झोकून द्यावे असे आवाहन मेक इन नाशिक या दोन दिवसांच्या प्रदर्शन व चर्चासत्र उपक्रमाचा समारोप करताना निमाचे अध्यक्ष एच एस बॅनर्जी यांनी केले.

ते म्हणाले की मेक इन नाशिक परिषद प्रचंड यशस्वी झाली हे कारण नाशिकचे ब्रांडिंग होण्याची चांगली सुरुवात आपण करू शकलो आहोत. या परिषदेत १८६९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांसंदर्भात एमओयू करण्यात आल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

येथील नेहरु केंद्रातील कल्चर सभागृहात या उपक्रमाच्या समारोपाचा शानदार समारंभ मान्यवर नाशिककर उद्योजक, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच पालक मंत्री गिरीश महाजन हे समारोपासाठी येणार होते पण ते त्यांच्या मंत्रालयायीन कामकाजामुळे येऊ शकले नाहीत याचा उल्लेख श्री बॅनर्जी यांनी केला.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उद्घाटनाच्या आपल्या भाषणात असे सांगितले होते की माझ्याकडे भेल सारखे २१ अवजड उद्योग व २८३ केंद्र सरकारच्या उपक्रमांचा कारभार आहे. तुम्ही तुमचा नेमका प्रस्ताव घेऊन माझ्याकडे दिल्लीत या आपण नाशिकला तुम्ही म्हणाल तो उपक्रम वा कारखाना आणू. अन्यथा अशा एखाद्या आणखी परिषदेतच  सहा महिन्यांनी आपली भेट होईल.

श्री गीते यांच्या म्हणण्याचा रोख प्रस्ताव व त्याचा पाठपुरावा न होणे याकडे होता. तो धागा पकडून श्री बॅनर्जी म्हणाले की कोणत्या उद्योगासाठी गीतेसाहेबांकडे प्रयत्न करायचे याचा विचार आमची निमा संघटना तर करेलच, पण नाशिकच्या अन्य सर्व उद्योग संघटनांनी किंबहुना सुजाण नाशिककर नागरिकांनी गांभिर्याने याचा विचार करावा व योग्य प्रस्ताव घेऊन आपण दिल्लीला जाऊया.

मुख्यमंत्री देवेनद्र फडणवीस यांनीही मेक इन नाशिक उपक्रमाला भरघोस सहाय्य केले, मार्गदर्शन केले व नाशिकच्या ब्रांडिंगच्या दृष्टीने पावले टाकली या बद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून श्री बॅनर्जी म्हणाले की नाशिकमध्ये एरोस्पेस हब होऊ शकतो किंवा संरक्षण क्षेत्रातील महत्वाचा उद्योग नासिकमध्ये आणता येऊ शकतो हे मुख्यमंत्र्यांनी जे सूतोवाच केले ते खूप महत्वचे आहे. एकंदरीत दोन दिवसांच्या या उपक्रमात चांगली चर्चा सत्रे झाली, सरकारी अधिकाऱ्यांनी विशेषतः विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आजच्या सत्रात सहभागी होऊन यांगले मार्गदर्शन केले याचा उल्लेख बॅनर्जी यांनी केला.

अमेरिकेतून आलेले जल प्रदूषण नियंत्रण सल्लागार श्री गॉर्डनमीन्स यांनी समारोपाच्या सत्रात भावना व्यक्त करताना मेक इन नाशिकचे कौतुक केले. ते म्हणाले की पाण्याच्या गुणवत्तेकडे आपण सर्वांनी जागरुकतेने लक्ष देण्याचीही गरज आहे. निमाचे पूर्वाध्यक्ष व मेक इन नाशिकच्या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार वेंकटाचलम, सूत्र संचालक स्नेहा ओक, प्रदर्शनाची उभारणी करणारे मोहनीश तसेच विविध स्टॉलधारकांचे प्रतिनिधी अशांचा सन्मान या प्रसंगी कऱण्यात आला.

निमाचे जनरल सेक्रेटरी उदय खरोटे यांनी म्हटले की आता या पुढे केंव्हाही निमा , क्रेडाई यांचा उल्लेख केला जाईल तेंव्हा आपोआपच मेक इन नाशिक उपक्रमाचाही उल्लेख केला जाईल इतकी ही परिषद लक्षणीय ठरली आहे. क्रेडाईचे सुनील कोतवाल यांनी म्हटले की नाशिकच्या अशा उपक्रमात आमची संघटना पुढेही सहभागी होईलच. नाशिकच्या ब्रँडिंगच्या दृष्टीने असे आणखीही उपक्रम केले जावेत .

निमाच्या एमओयू समितीचे अद्यक्ष आशीष नहार यांनी काल व आज करण्यात आलेल्या २९ एमओयूंची माहिती सादर केली व त्यात १८६९ कोटी रुपायंची नवी गुंतवणूक नाशिकमध्ये  येत असल्याचे नमूद केले. मेक इन इंडिया उपक्रमाचे अध्यक्ष एम एन ब्रह्मनाळकर यांनी शेवटी आभार मानले.

LEAVE A REPLY

*