दरोडा प्रकरणी अटकेत असणारा आरोपी फरार; सर्वत्र खळबळ

0
घरफोडीच्या गुन्ह्यातील चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरीदेऊन पोलीस ठाण्यातून पोबारा केल्याची घटना आज, सांयकाळी घडली.
यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, ग्रामीण सह शहर पोलिसही शोध मोहिम राबवून फरार संशयिता शोध घेत आहेत.
संभाजी विलास कवळे (वय २३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबर नगर, अंबड लिंकरोड, मुळ कोल्हापूर) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे.
आठ दिवसांपुर्वीच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या सात संशयितांना शिताफीने अटक केली होती. यामध्ये कावळेचा सहभाग होता. या गुन्ह्यात टोळीतील सराईत गुन्हेगारांनी दरोड्यासह दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहर पोलिसांनी सर्व गुन्ह्यामधील एकूण सात लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल संशयितांकडून जप्त केला होता. यानंतर सर्व संशयीतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.
 नाशिक तालुक्यातील मातोरी येथे घरफोडी केल्याची कबुली कवळेने दिली होती. शहर पोलिसांचा तपास पूर्ण झाला असल्याने मातोरी येथील घरफोडीचा तपास करण्यासाठी तालुका पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी कवळेला ताब्यात घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यास मंजुरी मिळाल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या एका पथकाने आज  सकाळी ११ वाजेच्या सुमारास कवळेचा मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतला होता. त्यानुसार दुपारी  त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर, चौकशी करीता कावळेला तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. या पोलिस ठाण्यामध्ये कोठडी नसल्याने कवळेला एका कोपर्‍यात लोखंडी बाकडावर बसवण्यात आले. होते. तर त्याची बेडी लोखंडी बाकडाला अडकविण्यात आली होती. दरम्यान, सांयकाळी ५.२० च्या सुमारास पोलीसांचे लक्ष नसल्याचे पाहुण त्याने शिताफीने बेडीतून अलगद हात काढून घेत  धूम ठोकली. कवळेने तालुका पोलिस स्टेशनच्या मागील बाजुने भुमिअभिलेख कार्यालयाच्या भिंतीवरून उडी मारून  सीबीएसच्या दिशेने तो फरार झाला. १० ते १५ मिनीटांनी कवळे फरार झाल्याची बाब तेथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी लागलीच शोध मोहिम सुरू केली. नियंत्रणकक्षासह शहर पोलीसांना सुचना देण्यात आल्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता.
त्या कर्मचार्‍यांना निलंबीत करणार
पोलीस ठाण्यातून संशयीत पळून जाणे ही अतिशय गंभीर बाब आहे, या प्रकरणाचा तात्काळ अहवाल मागविण्यात आला आहे. चौकशी करून निष्काळजीपणा करणार्‍यांविरोधात  निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.  संशयीताचा लवकरच  शोध घेऊन त्यास पुन्हा जेरबंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

LEAVE A REPLY

*