शिक्षकांचे वेतन आता राष्ट्रीयकृत बँकेत ; जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

0
नाशिक : वेतनप्रश्नी नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ)वतीने पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण आज जिल्हाधिकार्‍यांनी राष्ट्रीयकृत बँकेत वेतन जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. सोमवारी शिक्षणाधिकार्‍यांना बोलावून पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

आज टीडीएफ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या. नोव्हेंबर महिन्यात चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिक्षकांना मिळणारे त्यांचे हक्काचे वेतन पुरेशा प्रमाणात मिळणे बंद झाले.

नाशिक जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील जवळपास 18 हजार कर्मचार्‍यांचे सरासरी 55 कोटी रुपयांचे दर महिन्याला सरकारकडून प्राप्त झालेले वेतन जिल्हा बँकेने शिक्षक कर्मचार्‍यांना अदा करावयाचे असते. परंतु, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सरकारकडून प्राप्त झालेले पैसेही बँकेने वापरून घेतल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

या प्रकारामुळे पैशांअभावी शिक्षकांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. हा तिढा सोडवण्यासह अन्य वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, वेतन तत्काळ राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत देण्यात यावे, नाशिक जिल्हा बँकेतील पगार, पोषण आहार व पतसंस्थांचे कर्जाचे पैसे अशा सर्व रकमा तत्काळ रोखीने मिळाव्यात, बँकेच्या संचालक मंडळाने शिक्षकांचे पैसे शिक्षकांना न देता बेकायदेशीररित्या दुसर्‍या खात्यावर वर्ग केले म्हणून मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षकांचे म्हणणे जाणून घेवून एप्रिल महिन्याचे वेतन तातडीने राष्ट्रीयकृत बँकेमार्फत अदा करण्याचे आदेशित केले. तसेच पुढील कार्यवाहीबाबत सोमवारी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी आ.सुधीर तांबे, व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड उपस्थित होते. यावेळी शिक्षक संघटनेचे आर.डी.निकम, बी.आर.पाटील , एस.बी.देशमूख , साहेबराव कुटे , शशांंक मदाने , के.के.आहीरे , डि.यु.अहीरे , निलेश ठाकूर , रोहीत गांगुर्डे , एल.एन.सानप , शंकर सांगळे , दत्ता पाटील , यशवंत ठोक , भिका बावा , बी.के.सानप आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*