शिक्षक संघाचा पुणे येथे विराट मोर्चा

नवीन बदली धोरणास तीव्र विरोध

0
मडकीजांब | दि. १७ वार्ताहर- राज्य शासनाने दि. २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर केलेल्या शिक्षकांच्या नवीन बदली धोरणास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवार दि.२२ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन बदली धोरण जाहीर केले होते तेव्हापासून राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवीन व जुन्या शासन निर्णयात मोठी तफावत आहे. जुन्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय बदल्या फक्त तालुक्यातील तालुक्यात पंचायत समितीस्तरावर १० टक्के व विनंती ५ टक्के होत असते. जिल्हा स्तरावर फक्त विनंतीच्या ५ टक्के बदल्या होत आहे.

त्यामुळे शिक्षकांची फारशी गैरसोय होत नसे. एकदा शाळेवर बदली झाल्यावर ५ वर्षे त्या शिक्षकांची इतरत्र कोणत्याही कारणामुळे बदली होत नसल्यामुळे त्यांना ५ वर्षे स्थिरता असायची तसेच बदल्यांना टक्केवारी असल्यामुळे मर्यादा होती मात्र नवीन बदली धोरणात तालुका स्तरावरील बदली प्रक्रिया रद्द केली असून सर्व बदल्या या जिल्हास्तरावरून होणार आहेत.

बदल्या करत असताना सेवाजेष्ठता ही शाळेवरची किंवा तालुक्यातील ग्राह्य न धरता जिल्ह्यातील एकूण सेवा ग्राह्य धरली जाणार असल्याने शिक्षकांवर प्रत्येक वर्षी बदलीची टांगती तलवार राहणार आहे. एका शाळेवर शिक्षक किती वर्ष राहील याची खात्री नसल्याने त्यांच्यात स्थिरता राहणे शक्य नाही.

बदल्या या पूर्णपणे खो-खो पद्धतीने होणार आहे. ज्या शिक्षकास सेवाजेष्ठ शिक्षक खो देईल त्याची बदली होणार तसेच त्याने पुढच्या शिक्षकास खो दिल्यास प्रत्येक वर्षी असाच खो-खो चालू राहणार असल्याने व बदल्याची टक्केवारी नसल्यामुळे जिल्ह्यातील एकूण शिक्षक एवढेही बदल्या होवू शकतात.

इतर प्रश्‍नामुळे शिक्षक ग्रस्त झाला असून त्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरावर पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंंत या प्रश्‍नांची शासनाने दखल घेतलेली नाही. अंतर जिल्हा बदली प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट नसल्यामुळे यापूर्वी शिक्षकांनी जे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावाला कचराकुंडी दाखवली. पुन्हा दुसर्‍यादा ऑनलाईन माहिती भरावयास लावून त्यांच्या त्रासात भर घातली आहे.

सध्या सर्व शिक्षकांनी संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेले असतानाही त्यांची वेतनवाढ थांबवून वेतन वाढीची वसुली चालू केली आहे. ती वसुली थांबवावी. पदवी प्राप्त शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून भाषा, विज्ञान, समाजशास्त्र या विषयावर पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक दिलेली असताना त्यांना पदवीधर शिक्षकांचे वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही ती देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात येत आहे.

या सर्व बाबींमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा नवीन शासन निर्णय रद्द करण्यासाठी किंवा त्या निर्णयात अपेक्षीत बदल करण्यासाठी व यासह महत्वाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने यापूर्वीच दि.२६ एप्रिल रोजीच मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चा पुर्वीच राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना मुंबई येथे चर्चेला बोलावून विविध विषयांवर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले होते.

म्हणून दि.२६ एप्रिल रोजीच मोर्चा स्थगित केला होता, पण अद्यापपर्यंत शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रा.एस.डी. पाटील, राज्याचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील शिक्षक आयुक्त कार्यालयावर राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा दि. २२ मे रोजी दुपारी १ वाजता आंबेडकर पुतळ्यापासून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

बदली धोरणाविरुद्ध तीव्र असंतोष
शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री, शिक्षणमंत्री, सचिव यांच्या वेळोवेळी भेटी घेऊनही शिक्षकांवर अन्याय करणारा हा शासन निर्णय रद्द करण्यात आलेला नाही किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. शिक्षकांमध्ये असलेला प्रचंड असंतोष पुणे येथील मोर्चातून शासनास दाखवून देण्यात येईल.
-अंबादास वाजे
राज्य कार्याध्यक्ष-महाराष्ट्र राज्य प्राथमिक
शिक्षक संघ

LEAVE A REPLY

*