सहविचार सभेत शिक्षकाला बेदम मारहाण

0
संगमनेर (प्रतिनिधी) –विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढू लागल्याने मुख्याध्यापकांनी बोलविलेल्या सहविचार सभेत एका शिक्षकाला बेदम मारहाण झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील हनुमान विद्यालयात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्परविरोधी फिर्यादही दाखल झाली आहे.
पिंपळगाव देपा येथील हनुमान विद्यालयात मुख्याध्यापक जी. एम. पावसे यांनी विद्यार्थी गळतीबाबत सहविचार सभेचे आयोजन केले होते. त्या दरम्यान रावसाहेब किसन गांजवे हा तेथे आला. शिपाई सुदाम किसन थोरात यास शिक्षकपदावर बढती करतो काय? असे म्हणून शिक्षक साहेबराव सीताराम गांजवे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत साहेबराव गांजवे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 352, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे करत आहे.
तर परस्पर विरोधी फिर्यादीत रावसाहेब किसन गांजवे यांनी म्हटले आहे की, मुख्याध्यापक जी. एम. पावसे यांनी शाळेत सहविचार सभा बोलविली होती. या सभेस आपणालाही बोलविले होते. विद्यार्थी गळतीवरुन सभा सुरू होती. त्यावेळी रावसाहेब गांजवे म्हणाले, विद्यार्थी गळतीस शिक्षकच जबाबदार आहे, असे म्हटल्याचा शिक्षक साहेबराव गांजवे यांना राग आला. त्यांनी व त्यांच्यासह सहा जणांनी रावसाहेब गांजवे यास शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
याप्रकरणी रावसाहेब गांजवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी साहेबराव गांजवे व इतर सहा जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे करत आहे.

 

LEAVE A REPLY

*