बदली धोरणाविरुद्ध शिक्षकांचा मोर्चा

0

राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कायम लढत राहणार ः थोरात

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कायम शासनदरबारी लढत राहणार आहे, असे राज्याचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी आज प्राथमिक शिक्षकांच्या मोर्चाला संबोधित करताना सांगितले.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या 27 फेब्रुवारी 2017 च्या अन्यायकारक बदली धोरणाविरोधात व इतर विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पुणे येथे राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
दुपारी दोन वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात झाली. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयासमोरील पटांगणात जाऊन तेथे सभा झाली. या सभेचे प्रास्ताविक नाशिक विभाग अध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी केले. बाळासाहेब मारणे व सरचिटणीस अप्पासाहेब कूल यांनी राज्यातून आलेल्या प्राथमिक शिक्षकांचे स्वागत केले.
राज्य संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शासनाचे 27 फेब्रुवारी 2017 चे प्राथमिक शिक्षकांचे सध्याचे बदली धोरण कसे अन्यायकारक आहे हे सांगून इतर अनेक प्रश्न मांडले. राज्य संपर्कप्रमुख व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीने प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी 26 एप्रिलचा मोर्चा का माघारी घेतला, हे सांगून मुंबईच्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेनुसार कार्यवाही झाली नाही म्हणून हा मोर्चा काढावा लागल्याचे सांगितले.
राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न जोरदारपणे मांडले. तसेच आतापर्यंत राज्यसंघाने शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवलेल्या विविध प्रश्नांची माहिती दिली. तसेच प्राथमिक शिक्षक हा माझा परमेश्वर असून तो आनंदी राहण्यासाठी त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, शिक्षकांचे कोणतेही प्रश्न शासनाने प्रलंबित ठेवू नयेत,
यासाठी आयुष्यभर लढा देत आहे. प्राथमिक शिक्षकांचे सध्याचे अन्यायकारक बदली धोरण शासनाने मागे न घेतल्यास यापुढेही त्याबाबत जोरदार पाठपुरावा चालूच राहील.
सभेचे सूत्रसंचालन राज्य संघाचे कार्याध्यक्ष आंबादास वाजे यांनी केले. या मोर्चासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, संजय शेळके, बापूसाहेब तांबे, निळकंठ घायतडक, विठ्ठल फुंदे, दिलीप औताडे, विजय माने, आर. पी. रहाणे, दत्ता कुलट, तुकाराम अडसूळ, शरद सुद्रीक, संजय शिंदे, बाळासाहेब तापकीर, अविनाश निंभोरे, अर्जुन शिरसाठ, बाबा पवार, आर. टी. साबळे, नानासाहेब बडाख, प्रवीण ठुबे, भाऊराव राहिंज, किसन खेमनर, राम निकम, संतोष राऊत, बाळासाहेब कापसे, संतोष खंडागळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच सर्वसामान्य शिक्षक आणि राज्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 दोन दिवसांत संघाचे शिष्टमंडळ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अन्यायकारक बदली धोरणाबाबत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राज्याचे शिक्षण आयुक्त यांना राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले, या निवेदनात 27 फेब्रुवारी 2017 चे बदली धोरण रद्द करणे किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करून तालुक्याच्या बाहेर प्रशासकीय बदली करू नये, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना संगणक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देऊन त्याबाबतची वसुली थांबवणे, आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सर्व विषय शिक्षकांना प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी देणे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे शिक्षण आयुक्त यांच्यामार्फत दिले आहे. 

LEAVE A REPLY

*