स्वरूप अ‍ॅग्रोची ‘स्वधन’ विद्राव्य खते बाजारात

0
नाशिक : कृषी क्षेत्रात 24 वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वरूप अ‍ॅग्रोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीने ‘सॉल्वझ’ प्रीमियम श्रेणीची ‘स्वधन’ विद्राव्य खतांची मालिका बाजारात आणून विद्राव्य खतांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

स्वधन हे एकूण सहा ग्रेडमध्ये उपलब्ध असून देशभरातील साडेतीन हजाराहून अधिक विक्रेत्यांमार्फत शेतकर्‍यांना उपलब्ध असणार आहे, अशी माहिती स्वरूप अ‍ॅग्रोकेमिकल इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक समीर आर. पाथरे, हिमांशू शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वधन श्रेणीतील खतांमुळे नत्र, स्फुरद, पालाश ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकांना सुलभपणे व शुद्ध स्वरुपात उपलब्ध होतात. या खतांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांच्या वापरामुळे जमिनीवर गाळ तयार होत नाही व शेती पिकांच्या वाढीसाठी लागणार्‍या नत्राचा मुबलक पुरवठा पिकांना केला जातो. ‘सॉल्वझ’ श्रेणीची खते आधुनिक रासायनिक तंत्रज्ञानाने बनवलेली असून नवीनतम रासायनिक सूत्रांद्वारे निर्माण केली आहेत.

यामुळे रासायनिक खतांचा वापर 20 ते 25 टक्क्यांनी कमी होतो. ‘सॉल्वझ’चे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्थिर व नियंत्रित सामू (पीएच). यामुळे ही खते कमी-जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये बरोबरीने वापरली जाऊ शकतात. त्यांची विद्राव्यता जड व हलक्या पाण्यातही उत्तम प्रकारे होते. स्वधन खतांमध्ये पिकांना हानीकारक असणार्‍या द्रव्यांचा समावेश केलेला नसून ही खते पाण्यात त्वरित विद्राव्य होत असल्यामुळे ती जमिनीद्वारे तसेच फवारणीद्वारेही देता येतात.

कंपनीच्या जी-5 ग्रॅन्युल्स या दाणेदार उत्पादनाला 2005 साली भारत सरकारचे पेटंट मिळाले असून त्यांची ‘ह्युमिजेल’, ‘वेटोनिमा’, ‘इजिस’ ही उत्पादने पेटंटच्या प्रतीक्षेत आहेत. कंपनीच्या 26 उत्पादनांना नोका या पुण्यातील प्रसिद्ध संस्थेद्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. कंपनी चीन, थायलंड, व्हिएतनाम, बांगलादेश देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.

LEAVE A REPLY

*