कृषि आयुक्तांना निलंबीत करा : ना. विखे

0

शेतकरी मृत्युप्रकरणी एसआयटीकडून चौकशीची मागणी

मुंबई – यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन 18 शेतकर्‍यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषि आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे.
त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देखील विखे यांनी केली. त्यामुळेच या 18 शेतकर्‍यांना सरकारने आर्थिम मदत देण्याची घोषणा केली.
ना. विखे म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर आणि सोयाबीन आदी पिकांवरील किड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करताना हे प्रकार घडले आहेत. मात्र कृषि विभागाने अद्याप या घटना गांभिर्याने घेतलेल्या नाहीत.
फवारणीतून विषबाधा झाल्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही. तब्बल 18 शेतकर्‍यांचे मृत्यू झाल्यानंतरही राज्याच्या कृषी आयुक्तांनी तातडीने यवतमाळचा दौरा केला नाही.
कृषि आणि आरोग्य विभागाने फवारणी करताना नेमकी कशा पद्धतीने दक्षता घेतली पाहिजे, याबाबत जनजागृती केलेली नाही. दुसरीकडे औषध कंपन्या मात्र ही शेतकर्‍यांची चूक असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत, असा आरोप ना. विखे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*