सिंचन कामात सुलाचा मदतीचा हात

सीएसआर अंतर्गत गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ

0
शाश्‍वत शेतीसाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण अशा योजना हाती घेतला आहे. याअंतर्गत वाईन उत्पादन कंपनी असलेल्या सुलाने सामाजिक उत्तरदायित्वांंतर्गत या मोहिमेत सहभागी होत सीएसआर अंतर्गत सावरगाव येथे गाळ उपसा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नाशिक तालुक्याच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

गेल्या वर्षीप्रमाणे सुलाने याही वर्षी सीएसआर अंतर्गत पाझर तलावाच्या गाळाचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३७७८ क्युबिक मीटर माती काढण्यात आली आहे. याद्वारे ४० लाख लिटर पाणी साठवण क्षमता वाढवली जाईल. पावसाच्या सुरुवातीला हे काम पूर्णात्सवास येत असल्याने याचा फायदा सावरगावला होणार आहे.

गेल्यावर्षीही सुलाने शेतकर्‍यांसाठी पुढाकार घेत निफाड तालुक्यातील महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत ३४७ लाख लिटर पाण्याचे क्षेत्र वाढवले. त्यामुळे या गावातील वर्षभराचा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत झाली. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली.

मागील वर्षी सीएसआर अंतर्गत केलेल्या कामाच्या माध्यमातून १२ लाख रुपये खर्च करून ५०० लाख लिटर पाण्याचे क्षेत्र वाढले. सुमारे ४३९३ ट्रक इतक्या मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात येऊन जलसंवर्धनाचे क्षेत्र वाढविण्यात आले. सुलाने मे २०१६ ला सुरुवात केली. गंगापूर धरणातून २८८ ट्रक गाळाचा उपसा करून २५ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. सावरगाव येथील पाझर तलावासाठी ६४ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. त्यातून ६४३ ट्रक इतका वाळूचा उपसा करण्यात आला.

सुलाने शाश्‍वत उद्योग व पर्यावरणपूरक अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राज्याच्या काही भागात दर एक दोन वर्षांनी पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यास सुरुवात केली. यामुळे पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवणे शक्य झाले आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होत आहे. शाश्‍वत शेतीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असून सुलानेही या अभियानात सहभागी होत अनेक गावात मोहीम हाती घेतली आहे.
राजीव सामंत, सीईओ सुला

LEAVE A REPLY

*