‘ट्राफिक मार्शल’ अभावी महामार्गावर होणार कोंडी

0

सुधाकर शिंदे : नाशिक शहरातील महामार्ग व उड्डाण पुल देखभाल करणार्‍या एजन्सीकडुन महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी व अपघातांना आळा घालण्यासाठी सहा महिन्यापुर्वी सुरू झालेली ‘ट्राफिक मार्शल’ ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्हाईकडुन अद्यापही या सेवेला मंजुरी न मिळाल्याने महामार्गावरील गर्दींच्या चौकात शहर वाहतुक पोलीसांच्या मदतीला असलेले ट्राफिक मार्शल सेवा बंद केली जाणार आहे. परिणामी पुन्हा एकदा महामार्गावर वाहतुक कोंडीचा नागरिक व वाहनधारकांना अनुभवयास मिळणार आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (न्हाई) यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनचे विस्तारीकरण झाल्यानंतर शहरात उड्डाणपुलाचे काम झाले. शहरात उड्डाणपुल झाल्यानंतर तरी शहरातील वाहतुक कोंडी दूर होईल अशी नाशिककरांची अपेक्षा फोल ठरली. उड्डाणपुलावरुन थेटे शहराबाहेर जाणार्‍या वाहनांची संख्या अगदीच कमी असल्याचे स्पष्ट होऊन बहुतांशी वाहने ही शहरातून जात असल्याचे समोर आले.

यामुळे महामार्गावर पाथर्डी फाटा ते के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज, पुढे हॉटेल जत्रापर्यत मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागल्याने नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले. याचबरोबर वाहन अपघात व मृत्युची संख्या वाढत गेली. या एकुणच परिस्थीत लक्षात घेत शहरात महामार्ग व उड्डाण पुलाच्या देखभालीचे काम करणार्‍या ट्विनसिटी सहारा अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसेस या एजन्सीने गेल्या 12 डिसेंबर 2016 पासुन महामार्गावरील सहा – सात ठिकाणी वाहतुक पोलीसांच्या मदतीला ट्राफिक मार्शल म्हणुन जवळपास 20 – 23 युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन दिली होती.

महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्याच्या कामाबरोबर लहान मुले व वृध्दांना सुरक्षित महामार्ग ओलांडून देण्याचे काम या ट्राफिक मार्शलला देण्यात आले होते. शहरातील हॉटेल जत्रा चौफुली, रासबिहारी चौक (हनुमाननगर) चौफुली, अमृतधाम चौफुली, के. के. वाघ अभियांत्रिकी महहाविद्यालय प्रवेशद्वार, इंदिरानगर चौफुली, लेखानगर चौफुली व द्वारका सर्कल या वाहतुक कोंडीच्या चौकात हे ट्राफिक मार्शल शहर वाहतुक पोलीसांच्या मदतीला देण्यात आले होते. या ट्राफिक मार्शल झालेल्या युवकांना शहर वाहतुक शाखेच्यावतीने तात्पुरते प्रशिक्षण देण्यात आले होते. अशाप्रकारे ट्राफिक मार्शलची सेवा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यात यश मिळाले.

तसेच गेल्या सहा महिन्यात या भागातील अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊन अपघातातील मृत्युुचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

महामार्ग देखभालीचे काम करणार्‍या एजन्सीकडुन कार्यरत झालेल्या या मार्शल सेवेला मोठे यश आले. मात्र या एजन्सीने ट्राफिक मार्शल सेवेकरिता विशेष मंजुरी देण्याचा प्रस्ताव न्हाईकडे पाठविला होता. मात्र त्यास न्हाईने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. याच आता महामार्ग देखभालीचे काम करणार्‍या ट्विनसिटी सहारा अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसेस या एजन्सीचे कॉन्ट्रक्ट संपण्यास काही दिवस बाकी आहे.

या एकुणच घडामोडीमुळे या एजन्सीने काही दिवसात ही सेवा बंद करण्यासंदर्भात या ट्राफिक मार्शल असलेल्या युवकांना सांगितले आहे. या युवकांच्या मदतीने शहर पोलीसांनी मोठी मदत मिळाली होती. वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांच्या अनुपस्थित हे युवक महामार्गावर वाहतुक नियंत्रणाचे काम करीत असल्याने वाहतुक सुरळीत राहुन अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. असे असतांनाच ट्राफिक मार्शल सेवा बंद करण्यात येत आहे.

याच निर्णयामुळे आता महामार्गावर पुन्हा एकदा पोलीसांच्या अनुपस्थितीत दिसणारी वाहतुक कोंडी दिसणार असुन त्याचा परिणाम शहरालगत असलेल्या राज्य व जिल्हा मार्गांवर होणार आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा अपघात वाढण्याची शक्यता आहे. या प्रकारासंदर्भात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ही सेवा पुर्ववत ठेवावी अशी मागणी पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

*