Wednesday, April 24, 2024
HomeजळगावPhotos : राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘मुसक्या’ सुखाचा शोध घेणारे...

Photos : राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘मुसक्या’ सुखाचा शोध घेणारे भावस्पर्शी संघर्षनाट्य!

61व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेअंतर्गत सुरु असलेली जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी सध्या पूर्वार्धातून-उत्तरर्धात प्रवेश करीत आहे. दिवसागणिक उत्साहात भर पडतेय दर्दी नाट्य रसिकांची गर्दी मात्र अजून वाढायला हवी आहे. रात्री छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात सादर झालेले मुसक्या हे स्पर्धेतील सातवे नाटक प्रस्तुत नाट्यप्रयोग जळगावच्या कै. शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्टने सादर केले.

जुने जाणते रंगकर्मी, दिग्दर्शक, लेखक डॉ.हेमंत कुळकर्णी लिखीत आणि दिग्दर्शित या दोन अंकी नाट्य प्रयोगाने रसिकांना झंझवत, खुलवत अंतर्मुख करीत सुखाचा शोध घेणार्‍या सर्वसामान्य माणसाची म्हणजे तुमची आमची सर्वांचीच संघर्षमय काहाणी तिही अंतहीन कहाणी अत्यंत समरसून झाली सफाईदारपणे सादर केली. अनुभव संपन्न असलेल्या डॉ.कुळकर्णी स्पर्धेची परिणाम चांगल्यापैकी ठावूक असल्यामुळे सुत्रबध्द आणि प्रमाणबध्द असलेल्या आपल्याच नाट्यसंहितेवर दिग्दर्शक या नात्याने उत्तम संस्कार केले. कलावंत आणि तंत्रज्ञानीदेखील नियोजनबध्द कामगिरी केली त्यामुळे सादरीकरण दोन्ही अंकात प्रवाही आणि प्रभावी झाले. त्याबद्दल समस्त रंगकर्मींचे अभिनंदन! असो.

- Advertisement -

सामान्यपणे प्रत्येक माणूस कुठल्याना कुठल्या प्रकारे सुखाचा शोध घेत असतो. मग तो माणुस करोडपती असो वा रोडपती हा अंतहीन शोध आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वगैरे प्रत्येक स्तरावरील माणूस घेत असतो. सुखाच्या आशेने, ओढीने आशा, आकांक्षा घट्टपणे उराशी बाळगत तो शोध घेत जगत असतो. संघर्ष करीत असतो. त्यामुळे एका अर्थाने आपल्या सर्वांच्याच जगण्याची संघर्षची कहाणी म्हणजे मुसक्या.

खरंतर आपल्याला आजुबाजुला अशी कित्येक माणस दररोज पहायला मिळतात की जी, जगताहेत आणि कोणत्या आशेवर आला दिवस ढकलता हेत. असा प्रश्न पडतो. परिस्थितीच्या होरपळण्यार्‍या चटक्यांप्रमाणे त्यांची संवेदनाही बोथट आणि बधीर झाली आहे. अशी माणस आजही भोवताली दिसतात. त्यांच्याच जगण्याच प्रतिबिंब या नाटकात आहे. या नाटकातील तात्या (योगेश शुक्ल) हा साठ सत्तरच्या दशकातील माणसांचे प्रतिनिधीत्व करतो तर रंगराव (अमोल ठाकूर), त्यानंतरच्या दहा पंधरा वर्षातील पिढीचे तर तिघांच्या सुख-दुखाच्या वाटेकरी स्त्री (ंमंजुषा भिडे) असते. त्यांची परिस्थिती आणि वयोगट वेगळा असलातरी जीवनातील दुःख काही बदललेले नाही. त्यामुळे संवेदना बोथट आणि बधीर झालेल्या माणसांची दुर्लक्षित बाजू मांडतांना लेखकाने लिहीलेल्या या नाटकाचा आकृतीबंध हा अ‍ॅब्सर्ड शैलीतील आहे.

खरंतर परिस्थिती माणसाला वेगवेगळ्या मार्गाने हतबल करत असते. त्याच्यावर येणारी संकटांची मालिका संपत नसते. एक वेळ अशी येते की, तो या परिस्थितीपुढे खचून जीव देण्याचा सुध्दा विचार करतो. पण परिस्थितीने बांधलेल्या त्याच्या मुसक्या इतक्या घट्ट असतात की, तो ते ही करु शकत नाही अशावेळी त्याला फक्त आणि फक्त परिस्थिती नईल त्याप्रमाणे मृत्यू येईपर्यंत मार्गक्रमण करावे लागते. सुखाचा शोध हा अंतहीन आहे. आणि मृत्यू येईपर्यंत जगत रहाणे अटळ आहे. हा संदेश देत कधी हासवत-खुलवत परंतू अंतर्मुख करीत हे भावस्पर्शी संघर्षनाट्य संपते.

आता अभिनय कौशल्याचा विचार करता मध्यवर्ती भूमिकेतील तात्या म्हणजे योगेश शुक्ल यांनी आपल्या भूमिकेचे बेअरींग व्यवस्थित सांभाळले त्यामुळे तात्या लक्षवेधी झाला. रंगराव झालेल्या अमोल ठाकुरने मात्र लवचिक अभिनयामुळे धमाल आणली आणि रसिकांची दाद ही मिळवली. नामदेव झालेल्या अम्मार मोकशी यांनीही आपली भूमिका छान वठवली. गुणी कलावंत मंजुषा भिडे यांनी तात्याची व्याधीग्रस्त बायको रंगरावची कजाग बायको आणि नामदेवची वैतागलेली प्रेयसी या तिनही भूमिकेत आपल्या समर्थ अभिनयाने चांगल्यापैकी रंग भरले.

तांत्रिक बाबतीत सचिन आठारेंनी स्थळ, काळ सापेक्ष अशी गिरगावातील चाळ रंगमंचावर उभी केली. प्रकाश योजना जयेश कुळकर्णी यांनी परिणामकारक योजना केली तर उदय पाठक व धनंजय धनगर यांची पार्श्वसंगित व ध्वनी संकलन प्रसंगांना गती देणारे होते. हिंदी, मराठी, गाण्यांचा चपलख व समर्पक वापर झाला. श्रेयस शुक्ल (रंगभूषा), श्रध्दा शुक्ल (वेशभूषा), भूमिकांना अनुरुप होती. सर्वश्री अपुर्वा कुळकर्णी, निलेश जगताप आशिष राजपूत, सचिन चौघुले, गणेश बारी, पद्मनाथ देशपांडे यांचे रंगमंच सहाय्य व्यवस्थित.

एकूणच अनुभवी रंगकर्मी यांची सशक्त व प्रमाणबध्द संदेशग्राही नाट्य संहिता त्यांचेच लय व गती सांभाळणारे दिग्दर्शन कलावंतांचा समर्थ अभिनय तंत्रज्ञांची सफाईदार कामगिरी यामुळे जळगावकर रसिकांना सुखाचा शोध घेणारे एक भावस्पर्शी संघर्ष नाट्य अनुभवता आले हे अगदी निर्विवाद!

आजचे नाटक राशोमान इंदाई फाऊंडेशन, जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या