गाण्यातील ‘सोनू’ नावामुळे अनेक तरुणींची कुचंबणा

0
टाकळीमानुर (वार्ताहर) – सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने अक्षरश: बाजारात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोनू या नावाच्या तरुणींना त्याचा मनस्ताप होताना दिसत आहे. महाविद्यालयामध्ये या नावाच्या तरुणींना काही टारगट मुलांकडून त्रास होत आहे. तरुणी पुढे चालली की लगेच तिच्या पाठीमागून काही तरूण चालायला लागतात आणि भर रस्त्यात कोणाला तरी आवाज देऊन सोनू… तुला माझ्यावर भरोसा नाय काय? असे म्हणुन हिणवतानाचे चित्र दिसत आहे. काही शाळा-महाविद्यालयात शिक्षकांकडे या तरूणी तक्रार देखील करत आहेत. मात्र शिक्षक देखील त्या विद्यार्थ्यांना काहीच बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.
काही दिवसांपूर्वी शांताबाई या नावाच्या गाण्याने धुडगूस घातला होता. काही ठिकाणी तर काही महिलांनी या गाण्यावर थेट न्यायालयात धाव घेतली होती. महिलेच्या नावाने गाणे तयार केल्याने त्याची एक मोठी करमणूक होते, असे काहींचे मत आहे. यामुळे या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतो. शांताबाई, आला बाबूराव, आता सोनू हे गाणे अत्यंत हिट झाले आहे. मात्र जेवढे ते गाणे हिट झाले तेवढाच त्रास त्या नावाच्या व्यक्तींना झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मोबाईल मध्ये हे गाणे मोठ्या आवाजात लावून तरुण मुद्दामहून महाविद्यालयात जातात. सुरुवातीला तर काही तरूणींनी महाविद्यालयातच येणे बंद केले होते. राजकीय पुढार्‍यांनी देखील त्या गाण्याचा आनंद घेतला. गाण्यामध्ये सोनूच्या आईवडिलांबद्दल उच्चार केलेला असल्यामुळे तेच शब्द हे तरुण जाणीवपूर्वक उच्चारत आहेत.

LEAVE A REPLY

*