हागणदारीमुक्तीसाठी सोनईकर झपाटले

0

कुणी ठेवले दागिने गहाण तर कुणी घेतले व्याजाने पैसे; सभापती सुनिता गडाखांचा पुढाकार

नेवासा (का. प्रतिनिधी) – काहींनी दागिने गहान टाकले तर काहींनी व्याजाने पैसे घेतले मात्र शौचालय बांधायचेच या निर्धाराने सर्वांनी मनावर घेतले आणि बघता बघता सोनईसारखे मोठे गाव हागणदारीमुक्तीच्या दिशेने काम करु लागले. पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख यांनी गाव दत्तक घेवून सुरु केलेल्या प्रबोधनामुळे गांधीजयंतीच्या दिवशी सर्वात मोठ्या लोकसंख्येचे शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले जिल्ह्यातील सोनई हे पहिले गाव ठरणार आहे.

सोनईत 4100 कुटूंब वास्तव्य करतात. नेवासा तालुक्यातील हे मोठे गाव. गावातील 3500 कुटुंबांकडे आधीपासूनच वापर सुरु असलेली शौचालये आहेत. पंचायत समिती सभापती झाल्यावर सुनीता गडाख यांनी हागणदारीमुक्तीसाठी सोनई गाव दत्तक घेतले. शौचालये नसलेल्या 600 कुटुंबांमध्ये प्रबोधन करुन या कुटुंबांचाही शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केला.

त्यासाठी स्वतः अशा कुटुंबातील महिलांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई साळवे, सुनील गडाख, सरपंच संगीता वैरागर, उपसरपंच पुष्पा चांदघोडे सदस्य विद्या दरंदले, अलकाताई राशिनकर, शुभांगी बडे आदींसह सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी जनजागृती सुरु करुन या कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी राजी केले. बाहेर उघड्यावर जाण्यास किती त्रास होतो याचा अनुभव या कुटुंबांनी घेतलेला असला तरी अडचण होती ती एवढे पैसे आणणार कोठून? या अडचणीतून या कुटुंबांनीच मार्ग शोधले.

काहींनी आपल्याजवळ असलेले दागिने गहाण टाकले, काहींनी शेतकर्‍यांकडून पुढील मजुरीपोटी उचल घेतली तर काहींनी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. काही ज्येष्ठ नागरिकांनी दोन आठवडे बाजार केला नाही. काही दिवस चटणी-भाकरी खाऊ असे म्हणून पोटाला चिमटा घेवून शौचालयासाठी पैसे उभे केले. शौचालय बांधायचेच या निर्धाराने जुलै महिन्यात 300 कुटुंबांची शौचालये उभी राहिली.

सोनईसारखे मोठे गाव हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणे सोपे नव्हते. सुनीताताई गडाख यांच्या शब्दाला येथे महिला वर्गात असलेला मान हेही त्यामागे कारण आहे. महिलांच्या सक्रीय सहभागामुळेच हे शक्य होवू शकले. उर्वरीत 300 शौचालयांची कामे पूर्ण झाल्यावर शंभर टक्के हागणदारीमुक्त सोनई बनणार आहे. सर्व 31 अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, युवक कार्यकर्ते यांनी घरोघर जावून प्रबोधन करुन नागरिकांना प्रवृत्त केले. त्यांना ग्रामविकास अधिकारी श्री. निमसे यांचे मिळालेले सहकार्य यामुळे सोनईत हे स्वच्छतेचे मोठे आदर्श काम उभे राहात आहे.

ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून काम करते. पगारात भागत नाही. शौचालयाची गरज आम्हालाही पटत होती. रात्री-अपरात्री बाहेर जायची भीती होती. पण पैशाचा प्रश्‍न होता. सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले आणि काम सुरु केले.
– आशाबाई वैरागर
(सफाई कामगार)

आम्ही नवरा-बायको दोघेच राहतो. वय झाले असले तरी मोलमजुरीशिवाय पर्याय नाही. शौचालय सर्वच लोक बांधत आहेत. आम्हाला शौचालयाचे महत्व पटले आहे म्हणून कसेतरी पैसे उभे करुन शौचालयाचे काम करत आहोत.
– कडूबाई दरंदले
(शेतमजूर)

बाहेर जायला कोणाला बरे वाटते? पण शौचालय बांधायचे तर पैसे आणणार कुठून? आम्ही शेतमजुरी करुन पोट भरतो. शौचालय बांधाच म्हणाले म्हणून बँकेत दागिने गहाण ठेवले अन् शौचालयाचे काम पूर्ण केले.
– बेबीताई वाघमारे, (शेतमजूर)

LEAVE A REPLY

*