साडेसहा लाखाचे चंदन जप्त

तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0
नाशिक | दि. २७ प्रतिनिधी  – शहर व ग्रामिण भागात मळे परिसरातून चंदनाच्या झाडांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफास करण्यात म्हसरूळ पोलीसांना यश आले असून यातील एकास जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६ लाखाचे चंदन व इतर साहित्य असा ७.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलांच्या प्रसांगवधानाने ही घटना उघडकीस आली. म्हसरूळ शिवारातील एका शेताच्या बांधावर असलेली चंदनाची झाडे कापून त्याची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या चंदन तस्करांच्या टोळीचा पाठलाग करून यातील एकास पकडण्यात आले आहे.

तर त्याचे साथीदार दुचाकी सोडून फरार झाले असून घटनास्थळी मिळालेल्या दोन दुचाकींसह पोलिसांनी सुमारे साडे सात लाख रूपये किमतीची झाडाची ओंडके हस्तगत केली आहेत. या टोळीने परिसरातील २५ झाडे तोडली असल्याचे समोर आले आहे.
सुरज मधूकर दाभाडे (रा. काळाराम मंदिर उत्तरदरवाजा, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ पोलिस ठाण्याचे बिट मार्शल टेमगर व भोये हे आज दुपारी रोडने गस्त घालीत असतांना म्हसरूळ शिवारातील वाघाडी नदीकडे जाणार्‍या नाल्याच्या कडेला त्यांना झाडांची ओडके आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

दोघा कर्मचार्‍यांनी आपले वाहन रस्त्यावर लावून नाल्यातील पाय वाटेने पुढे गेले असता तीन चार युवकांचे टोळके कटरच्या सहाय्याने चंदनाची झाडे तोडतांना आढळून आले. मात्र संशयीतांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी आपली वाहने सोडून धुम ठोकली. यावेळी पोलिसांनीही चंदन तस्करांचा पाठलाग केला असता सुरज दाभाडे पोलिसांच्या हाती लागला तर त्याचे साथीदार पसार होण्यास यशस्वी झाले.

घटनास्थळावरून पोलिसांनी पल्सर (क्र. एमएच १५ एफएस ०६२७ व एमएच १५ बीएफ २४२३) या दुचाकींसह सुमारे साडे सहा लाख रूपये किमतीचे पोत्यात भरलेले लहान मोठे ओढके हस्तगत केले आहेत. याप्रकरणी सिताराम माधव सातकर (रा. सातकरमळा, वरवंडीरोड, म्हसरूळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात झाडांचे जतन व संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व वरिष्ठ निरीक्षक सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

*