श्रीगोंद्यात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीं

0

दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर दरोडा व जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी)  –  मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप समर्थक आणि भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू होता. या वादातूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. ऋषिकेश गायकवाड आणि भाजपाचे नगरसेवक सुनील वाळके यांच्यात समोरासमोर वादावादी होऊन तुफान हाणामारी झाली. यामध्ये अ‍ॅड. ऋषिकेश गायकवाड जखमी झाले असून याप्रकरणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर दरोडा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे नगरसेवक सुनील वाळके यांच्यासह एकूण 20 जणांनी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मेन रोड भागात मागील वादातून लोखंडी, गज, काठ्यांनी अ‍ॅड. ऋषिकेश गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण करून जखमी केले. तर याच वादातून सुनील वाळके आणि त्यांचे समर्थकांनाही मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाच्या 20 जणांवर तर आमदार राहुल जगताप गटाच्या सात ते आठ जणांवर दरोड्याचा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या या वादाला मागील काही दिवसांपासूनची किनार आहे. आता या वादातही आरोपींमध्ये माजी मंत्री पाचपुते यांचे स्वीय सहायकांचा आणि वाळके यांचे नातेवाईक असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आ. जगताप यांच्या निकटवर्तीय आमदार कार्यालय प्रमुख व राष्ट्रवादी समर्थकांचा समावेश आहे.
आ. जगताप गटाच्या ऋषिकेश गायकवाड यांना तर नगरसेवक वाळके यांचे गटाचे गणेश पोपट चांदगुडे यांना पोलिसांनी अटक केली असून ऋषिकेश गायकवाड यांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.
श्रीगोंदा पोलिसात अ‍ॅड. ऋषिकेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गायकवाड व त्यांचा मित्र मंगेश मोटे हे दिनांक 24 रोजी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील शिंपी गल्लीतील मशिदीजवळ आले होते. तेव्हा नगरसेवक सुनील वाळके यांनी त्यांची स्कॉर्पिओ एमएच 16, 9995 ही गाडी आपल्या अंगावर घालून आम्हाला दोघांना खाली पाडले.
त्यानंतर त्यांच्या गाडीतील पिंटू मोटे हे व इतर वाळके समर्थक कार्यकर्ते यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. नगरसेवक सुनील वाळके यांनी हातात लोखंडी गज घेऊन तुला माज आला का? असा दम देत मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे स्वीय सहायक विशाल सकट यांनी, तू पाचपुतेंना नेहमी विरोध का करतोस? तुझा 30 जूनचा वाढदिवस कसा साजरा करतो बघ असा दम देत समर्थकांना आपल्याला मारण्यासाठी चिथावणी दिली.
त्यानंतर या समर्थकांनी पोलीस वापरतात तशा लाठ्या, लोखंडी गज याने मांडीवर, पाठीवर, डोक्यात मारहाण केली. दीपक मखरे याने तलवारीने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. पण आपण तो वार चुकवला. तसेच गायकवाड यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, मोबाईल व खिशातील 20 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज दीपक मखरे याने जबरदस्तीने काढून अनिल वाळके यांच्याकडे दिला. गायकवाड यांना वाचवायला आलेले मित्र मंगेश मोटे मध्ये आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
याबाबत अ‍ॅड. ऋषिकेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाचपुते गटाच्या सुनील वाळके, राहुल वाळके, गणेश चांदगुडे, दीपक मखरे, सचिन वाळके, परिस जाधव, पिंटू उर्फ प्रदीप मोटे, सागर मखरे, विशाल सकट, प्रवीण मखरे, रमेश मोरे, चांदगुडे नावाचा पोलीस, मंगेश वाळके, दत्तात्रय वाळके, नितीन वाळके, बाळासाहेब ऊर्फ धोंडिबा मखरे, नाना मखरे, अक्षय मखरे, अनिल वाळके (सर्व रा. मखरेवाडी) यांच्यावर दरोडा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद भाजप नगरसेवक सुनील वाळके गटाच्या गणेश पोपट चांदगुडे यांनी दिली. यामध्ये म्हटले आहे की, आपण शहरातील अर्बन बँके जवळ आलो असता, ऋषिकेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी आपल्याला आडवून सुनील वाळकेचे खाऊन माजलास का? नीट रहा, नाहीतर काटा काढीन. असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण करून 40 हजार रुपयांची चेन लुटून नेली.
गायकवाड यांनी सुनील वाळके यांच्या हाताला चावा घेऊन त्यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी आ. जगताप गटाच्या ऋषिकेश गायकवाड, मंगेश मोटे, मंगेश सूर्यवंशी, अक्षय काळे व इतर तीन ते चार अनोळखी लोकांविरोधात दरोडा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश मनतोडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*