शिवसेनेचे आज कृषी अधिवेशन

उद्धव ठाकरेंसह सेना मंत्र्यांची उपस्थिती

0
नाशिक | दि. १८ प्रतिनिधी – शेतकरी कर्जमुक्तीसह त्यांच्या विविध प्रश्‍नांवर निर्णायक भूमिका घेण्यासाठी उद्या शुक्रवारी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रव्यापी कृषी अधिवेशन नाशकात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व मंत्री, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधव असे सुमारे १० हजार प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खा. राजू शेट्टी यांची अधिवेशनातील उपस्थिती लक्षवेधी ठरणार असून ते सेनेसोबत आणि उद्धव ठाकरे पक्षाची कोणती भूमिका जाहीर करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी उद्या कृषी अधिवेशन होणार आहे. शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर मंत्री व पदाधिकार्‍यांचे दौरे सुरू असून शेतकर्‍यांची कर्जमुक्ती व्हावी आणि त्यांच्या प्रश्‍नांवर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावेत ही भूमिका घेत या कृषी अधिवेशनाद्वारे राज्यभर रणशिंग फुंकले जाणार आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असताना मराठवाड्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विचारमंथन करताना स्वत: शेतकर्‍यांकडून त्यांच्या भावना ऐकल्या जाव्यात आणि त्यानंतर सेनेकडून ठोस भूमिका घेतली जावी या उद्देशाने हे अधिवेशन होत आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा, समृद्धी महामार्गातील शेतकरी, शेतीचे प्रश्‍न व उपाययोजना, शेतकरी संपावर का निघाले? आणि कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रमुख विषयांवर काही प्रमुख वक्त्यांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी आज पत्रकारांना दिली. या अधिवेशनात अडचणीत सापडलेले शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे कुटुंबिय, अस्मानी संकटात पिके गेलेले शेतकरी हे आपले अनुभव कथन करणार आहेत.
अधिवेशनात सकाळी ९ वाजता सहभागी शेतकर्‍यांची नोंदणी होणार असून नंतर सकाळी १० वाजेच्या सत्रात शेतकर्‍यांचे प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडणार आहेत. त्यानंतर नानासाहेब पळसकर, संजय उन्हाळे, प्रवीण जाधव व राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी आणि माजी मंत्री विनायकदादा पाटील हे शेतकर्‍यांसंदर्भातील शासनाच्या भूमिकेवर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. अधिवेशनानिमित्त या ठिकाणी कृषी उत्पादनाचे कीटकनाशके, खते, नेट पॉलिथीन व इतर असे पंधरा स्टॉल लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी नवनवीन उत्पादनांची माहिती शेतकर्‍यांना व्हावी आणि वस्तूंची खरेदी शेतकर्‍यांना करता येणार आहे.

 

नाशिक शिवसेनेला ठरतेय लकी…

नाशिक आणि शिवसेना यांच्यात शिवसेनाप्रमुखांपासून भावनिक नाते आहे. नोव्हेंबर १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी नाशिक येथे शिवसेनेचे अधिवेशन घेऊन रणशिंग फुंंकले होते. त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली होती. हीच भावना लक्षात घेत पक्षप्रमुखांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी नाशिकची निवड केली आहे. या पुण्यनगरीतून उद्या शिवसेनेची एक मोठी चळवळ राज्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती अजय बोरस्ते यांनी दिली.

अधिवेशनाची अशी आहेत वैशिष्ट्ये…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री, संपर्कप्रमुख हे शासकीय विश्रामगृहावर थांबणार आहेत. अधिवेशनात सहभागी होणार्‍या सर्वांना जेवणासाठी झुणका भाकर, मिरचीचा ठेचा व रव्याची लापशी असा मेनू ठेवण्यात आला आहे. हार-तुर्‍यांना या ठिकाणी फाटा देण्यात येणार असून पाहुण्यांचा उपरणे व टोपी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशन प्रवेशद्वाराला कै. मतेंचे नाव
शिवसेनेचे जिल्हा नेते व माजी शेतकरी सेना जिल्हाप्रमुख दिवंगत निवृत्ती मते यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी सेनेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराला कै. निवृत्ती मते प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.

उद्धव यांची पूर्णवेळ हजेरी
अधिवेशनात पहिल्या सत्रात शेतकरी आपल्या व्यथा व भावना मांडणार असून नंतर होणारे वक्त्यांचे मार्गदर्शन हे पक्षप्रमुख ठाकरे पूर्णवेळ हजर राहून ऐकणार आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. पक्षप्रमुखांसमवेत शिवसेनेचे सर्व मंत्री व्यासपीठासमोर उपस्थित राहणार आहेत.
प्रवेशद्वाराजवळ शिवतीर्थची प्रतिकृती
अधिवेशन स्थळाबाहेर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवतीर्थची प्रतिकृती मांडली जाणार आहे. अधिवेशनात सहभागी होणारे सर्व पदाधिकारी, मंत्री, शेतकरी व शिवसैनिक यांना बाळासाहेबांकडून प्रेरणा मिळावी म्हणून या स्मारकाला नमन करून आत प्रवेश करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*