जलक्रांतीतून केलेल्या कामाचा लाभ निश्‍चित

0

डॉ. सुजय विखे ः शिर्डी व अस्तगावात बंधार्‍यातील पाण्याचे जलपूजन

 

शिर्डी (प्रतिनिधी) – लोकसहभागातून शिर्डी मतदारसंघात राबविण्यात आलेल्या जलक्रांती अभियानाचे महत्त्व आज सिद्ध झाले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे गोदावरीच्या ओव्हरफ्लोचे पाणी या तळ्यांमध्ये साठल्याचा निश्चित लाभ भविष्यात होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

जलक्रांती अभियान अंतर्गत शिर्डी आणि अस्तगाव येथे लोकसहभागातून करण्यात आलेल्या बंधार्‍यातील पाण्याचे पूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, जलक्रांती अभियानाची चळवळ ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण दाखवून देणारी ठरली आहे. लोकांच्या सहभागातून साकारलेल्या या चळवळीचे महत्त्व आज अधोरेखित होत आहे.

 

 

पावसाचे प्रमाण कमी आहे. पण गोदावरी धरण समूहात पावसाने चांगली हजेरी लावली. धरणातून सोडलेले ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यातून सोडावे, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी जलसंपदा विभागाकडे प्रयत्न केले, म्हणूनच आज गावोगावी तयार करण्यात आलेल्या बंधारे आणि तळ्यांमध्ये पाणी साठविणे शक्य झाले असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

 

 

जलक्रांती अभियानाच्या या उपक्रमात जनसेवा फाउंडेशन बरोबरच लोकांनी योगदान दिले. गणेश सहकारी साखर कारखाना, डॉ. विखे पाटील कारखान्यातील कामगारांनी देखील या उपक्रमाला दिलेली साथ मोलाची असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक राम कोते, नितीन कोते, सुजीत गोंदकर, प्रमोद गोंदकर आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*