शेवगावात डबल मर्डर

नाजूक प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय ; तिसर्‍या जखमीला उपचारासाठी नगरला हलविले

शेवगाव (प्रतिनिधी)– हरवणे कुटुंबियांचे खून प्रकरण ताजे असतानाच शेवगावात आणखी दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. आखेगाव रस्त्यावर दोन मृतदेह आढळून आले असून त्यात एक महिला आहे. तसेच गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या तिसर्‍या व्यक्तीस नगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दीपक रामनाथ गोर्डे (रा. धनगरगल्ली, शेवगाव) आणि मंगल अळकुटे (रा. दहिगावने) असे मृत दोघांची नावे आहेत. बाळू रमेश केशभट (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) असे जखमीचे नाव आहे. सकाळी फिरणार्‍या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. शहरात दोन खून झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. गेल्या महिन्यात विद्यानगर येथे हरवणे कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शेवगावमध्ये भितीचे वातावरण होते. त्यानंतर पुन्हा दोन खून झाले आहेत. त्यामुळे शेवगाव हदरले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षकांनी तपासाच्या दृष्टीने काही सूचना दिल्या आहेत. तसेच घटनास्थळी पुरावे जमा करण्यासाठी फिंगर प्रिंट विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलीस अशी पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लवकरच या खुनातील आरोपी अटक करण्यात येतील अशी माहिती पोलीस उपअधिक्षक शिवथरे यांनी दिली. जखमी बाळू केसभट हा या घटनेतील एकमेव साक्षीदार असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले आहे. बेशुध्द असल्याने त्याचा जबाब घेतला नसून तोच या घटनेची माहिती देईल असे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी दारूच्या बाटल्या, मोबाईल, अन् मोटारसायकल..
पोलिसांना घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तीन मोबाईल, एक दुचाकी (एम. एच 14 एपी 4509) व काही मद्याच्या बाटल्या घटनास्थळाहून ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी तपासाला गती दिली असून श्‍वानपथक, वैज्ञानिक पथक व अंगुलिमुद्रा या पथकांनी त्यांचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या घटनेतील काही संशयीत देखील पोलिसांच्या रडावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*